RSS Chief Mohan Bhagwat : हिंदूंशिवाय भारत नाही आणि भारताशिवाय हिंदू नाहीत; असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी केलं आहे. ग्वाल्हेरमधील एका कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. ते म्हणाले की, "भारताची फाळणी झाली, पाकिस्तानची निर्मिती झाली कारण आपण हिंदू आहोत ही भावना विसरलो, तेथील मुस्लिमही हे विसरले होते. स्वतःला हिंदू समजणाऱ्यांची शक्ती आधी कमी झाली, नंतर संख्याही कमी झाली, त्यामुळे पाकिस्तान आता भारत राहिला नाही."
मोहन भागवत म्हणाले की, हिंदू आणि भारत वेगळे होऊ शकत नाहीत. भारताला भारत म्हणून राहायचं असेल, तर भारताला हिंदू म्हणूनच राहावं लागेल. हिंदूना हिंदूच राहायचं असेल, तर भारत एकसंध असावा लागेल. पुढे बोलताना ते म्हणाले की, हा हिंदुस्थान आहे आणि हिंदू येथे पंरपरेनं राहतात. ज्याला हिंदू म्हणतात, त्या सर्व गोष्टी या भूमीत विकसित झाल्या आहेत. भारताबद्दलच्या प्रत्येक गोष्टींचा संबंध भारताच्या भूमीशी आहे, हा योगायोग नाही.
मोहन भागवत पुढे बोलताना म्हणाले की, "अनेकजण म्हणतात की, पूर्वी विज्ञानानं जोडल्या गेलेल्या गोष्टी वेगळ्या होत्या. आता जगाला जागतिक बाजारपेठ बनवायची आहे. आता लोक म्हणतात की, जगात उपभोगासाठी जगावं लागतं, संसाधनं कमी आहेत, माणसं जास्त आहेत, त्यामुळे आता उपभोगासाठी स्पर्धा आहे." पुढे बोलताना ते म्हणाले की, "तुमचा जन्म हा उपभोगासाठी नसून तपश्चर्येसाठी आहे, तुमचे जीवन तोपर्यंतच सुरु आहे, जोपर्यंत दुसऱ्याचं सुरु आहे."
स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांशी लढण्यासाठी उत्साह हवा होता, पण नंतर विचार केला की, जोशातून स्वातंत्र्य मिळालं, तर निर्मितीची गरज भासेल. त्यामुळे होश असणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यात आला. जेव्हापासून देशात जोश असणाऱ्यांसोबत होश असणाऱ्या व्यक्ती एकत्र आल्यात, तेव्हापासून देशात अधिक अच्छे दिन आले आहेत.
हिंदू धर्म म्हणजे, चार मूल्यांवर आधारित जीवन. हिंदूंना भारतापासून वेगळे करून इतिहास घडू शकत नाही, असं ते म्हणाले. पुढे ते म्हणाले की, "हिंदूंची संख्या कमी झाली, शक्ती कमी झाली, केवळ तुम्ही नावानं हिंदू असाल तर काय उपयोग? हत्ती सर्कसमध्ये फुटबॉल खेळतो, पण त्याला सुवर्णपदक मिळत नाही. सिंह हा सर्कसमध्ये राजा नसतो, तो जंगलातच राजा असतो."
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा
महत्त्वाच्या इतर बातम्या :