RSS आणि गडकरींकडूनच मोदींच्या हत्येचा कट : शेहला रशीद
एबीपी माझा वेब टीम | 10 Jun 2018 03:08 PM (IST)
नितीन गडकरी यांनी कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. यानंतर मात्र आपण हे ट्विट उपरोधिकपणे केल्याचा दावा शेहला रशीदने केला आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला आहे, असं खळबळजनक ट्विट जेएनयू विद्यार्थी संघटनेची माजी उपाध्यक्षा शेहला रशीद हिने केलं आहे. यावरुन गडकरी यांनी कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. यानंतर मात्र आपण हे ट्विट उपरोधिकपणे केल्याचा दावा शेहलाने केला आहे. शेहला रशीदने काय म्हटलं होतं? जेएनयूची माजी उपाध्यक्षा शेहला रशीदने ट्वीटमध्ये म्हटले की, ''आरएसएस आणि नितीन गडकरी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचत आहेत. आणि त्यानंतर मुस्लीम आणि कम्युनिस्टांवर आरोप लावा आणि मुस्लीमांचे हत्याकांड करा.”, असे शेहला म्हणाली. यावेळी तिने #RajivGandhiStyle हॅशटॅगचा वापर केला आहे. शेहला रशीद कोण आहे? शेहला रशीद जेएनयू विद्यार्थी संघटनेची माजी उपाध्यक्ष आहे. भाजपविरोधात ती अत्यंत प्रखर भूमिका घेते. 2016 साली ज्यावेळी जेएनयू विद्यार्थी संघटनेचा तत्कालीन अध्यक्ष कन्हैया कुमारवर देशद्रोहाचा आरोप लावण्यात आला, त्यावेळी कन्हैयाच्या समर्थनार्थ शेहला रशीदने आंदोलन केले होते. मूळची श्रीनगरची राहणारी शेहल रशीद सध्या पीएचडी करत आहे.