Young man cleaning River News : मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील बियाओरा येथील अजणार नदी सध्या तिच्या स्वच्छतेमुळेच नव्हे, तर एका तरुणाच्या मोठ्या कामामुळं चर्चेत आली आहे. 21 वर्षीय तरुणाने अजणार नदी स्वच्छ केली आहे. सुरेंद्र सिंग चौधरी उर्फ बिट्टू तबाही असं या तरुणाचं नाव आहे. या तरुणाचे नदी साफ करतानाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहेत. उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्यापासून ते मुख्यमंत्री मोहन यादव आणि इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन यांच्यापर्यंत सर्वांनी त्याच्या कामाचे कौतुक केलं आहे.
पाठिशी ना कोणती संस्था, ना कोणतं यंत्र तरीही युवकानं केलं मोठं काम
एके काळी अस्वच्छतेमुळं ज्या नदीकाठावर उभे राहणेही कठीण होते, तिथे आता बदल झाला आहे. ही नदी प्लास्टिक, कचरा, गाळ आणि घाणीने तुंबली होती. लोकांची ये-जा सुरूच होती, पण नदी स्वच्छ करण्याची जबाबदारी कोणीही घेत नव्हते. मात्र, 21 वर्षाच्या बिट्टू तबाही या तरुणाने नदी स्वच्छ करण्याची जबाबदारी घेतली. बीएससीचा विद्यार्थी नदीत उतरला. त्याच्या पाठीशी कोणतेही मोठे यंत्र किंवा कोणतीही मोठी संस्था नव्हती. त्याने आपल्या हातांनीच कचरा काढायला सुरुवात केली.
या मुलाचे नाव सुरेंद्र सिंग चौधरी आहे, पण तो सोशल मीडियावर 'बिट्टू तबाही' या नावाने ओळखला जातो. मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील बियावरा येथे राहणाऱ्या बिट्टूने 26 जानेवारी 2026 रोजी अजणारा नदी स्वच्छ करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्याचे काही मित्र त्याला सामील झाले, पण नंतर त्याने बहुतेक काम एकट्यानेच केले.
कोण आहे 'बिट्टू तबाही' ?
सुरेंद्र सिंग चौधरी हा बीएससीचा विद्यार्थी आहे. तो सोशल मीडियावर 'बिट्टू तबाही' या नावाने ओळखला जातो. जेव्हा त्याने अजणार नदीची अवस्था पाहिली, तेव्हा केवळ तक्रार करण्याऐवजी त्याने ती स्वतः स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला. नदीकाठावर आणि पाण्यात प्लास्टिक, बाटल्या, कचरा, जलपर्णी आणि इतर टाकाऊ वस्तूंचे ढिग साचले होते. बिट्टूने हा कचरा एक-एक करून काढायला सुरुवात केली. त्याने स्वच्छतेच्या या प्रक्रियेचे चित्रीकरणही केले आणि स्वच्छतेपूर्वीचे व नंतरचे दृश्य आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले. त्याची कहाणी या कारणास्तवही वैशिष्ट्यपूर्ण आहे की, ही एक-दोन दिवसांची मोहीम नव्हती. त्याने महिनोन् महिने तेच काम केले.
26 जानेवारी रोजी मोहिमेला केली होती सुरुवात
बिट्टूने 26 जानेवारी, 2026 रोजी अजणार नदी स्वच्छ करण्यास सुरुवात केली. त्याने एका मुलाखतीत सांगितले की, प्रजासत्ताक दिनी त्याला काहीतरी सामाजिक हिताचे करण्याची गरज वाटली. त्यानंतर तो नदीत उतरला आणि स्वच्छता करू लागला. सुरुवातीला त्याचे काही मित्र त्याच्यासोबत होते, पण हळूहळू ते त्याला सोडून गेले. असे असूनही, बिट्टू आपल्या निश्चयावर ठाम राहिला. तो एकटाच नदीत उतरून तासन्तास कचरा काढत असे.
स्वतःचे पैसे गुंतवले, 30000 रुपये खर्च केले
मिळालेल्या माहितीनुसार, बिट्टूने या मोहिमेवर स्वतःच्या खिशातून अंदाजे 30000 रुपये खर्च केले. त्याने हे पैसे स्वच्छतेचे साहित्य आणि कचराकुंड्या खरेदी करण्यासाठी गुंतवले. त्याने कचरा वेगळा करून त्याचे खत बनवण्याचाही प्रयत्न केला. दूषित पाण्यातून चालल्यामुळे त्याच्या हातांना जंतुसंसर्गही झाला होता, पण तरीही त्याने स्वच्छता सुरुच ठेवली.
बिट्टूच्या कामाचं सर्वत्र कौतुक
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यासह उद्योगपती आनंद महिंद्रा तसेच इंग्लडच्या संघाचा माजी खेळाडू केवीन पिटरसनने बिट्टूच्या कामाचे कौतु केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याची बिट्टू यांचीही भेट घेतली. अजणार नदी स्वच्छ करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. बिट्टूचे काम प्रेरणादायी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. कोणतीही मोठी सरकारी यंत्रणा किंवा संसाधने नसताना, केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर नदीची स्थिती बदलणे, हेच एक मोठे यश आहे. मुख्यमंत्र्यांनी अशा जलसंधारण आणि पर्यावरणविषयक प्रयत्नांमध्ये सरकारला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले.
