नोकरीचा शेवटचा दिवस तसाही आयुष्यभर लक्षात राहातो. कारण, आयुष्याची अनेक वर्षे ज्या नोकरीत आपण घालवलेली असतात ते कार्यालय सोडताना डोळे भरून येतात. असा हा नोकरीचा शेवटचा दिवस गोड व्हावा यासाठी काहीजण प्रयत्न करतात आणि त्यात यशस्वी होतात. असाच काहीसा प्रकार 30 सप्टेंबर रोजी तमिळनाडूचे पोलीस महासंचालक (प्रशिक्षण) प्रतीप फिलीप यांच्याबाबतीत घडलाय. त्यांचा नोकरीचा शेवटचा दिवस कमालीचा अविस्मरणीय ठरलाय आणि त्याला कारणही तसंच आहे.


प्रतीप फिलीप 34 वर्षांच्या सेवेनंतर गुरुवारी निवृत्त झाले. निवृत्त होताना फिलीप यांनी त्यांची कॅप घालून नावाचा बॅज लावला होता. आता तुम्ही म्हणाल त्यात काय विशेष? निवृत्त होताना अधिकारी त्यांची कॅप आणि बॅज वापरतातच. पण फिलिप यांनी परिधान केलेली कॅप आणि बॅज हा त्यांचे निवृत्त होत असतानेच पद दर्शवणारा नव्हता तर चक्क 30 वर्षांपूर्वीची त्यांची आठवण ताजी करणारा होता. या कॅपवर आणि बॅचवर रक्ताचे डाग होते. हो तुम्ही वाचताय ते अगदी खरंय.


21 मे 1991 मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी श्रीपेरुम्बुदूर येथे निवडणूक प्रचारासाठी गेले होते. पण तेथेच त्यांच्यावर आत्मघाती हल्ला झाला आणि त्यांची हत्या करण्यात आली. प्रतीप फिलिप तेव्हा कांचीपुरममध्ये सहायक पोलीस अधीक्षक होते आणि राजीव गांधींच्या सभेच्या सुरक्षेसाठी तैनात होते. या हल्ल्यात प्रतीप फिलिपही जखमी झाले होते. त्यावेळी घटनास्थळावरून तपास यंत्रणेने ज्या वस्तू गोळा केल्या त्यात फिलिप यांची रक्ताचे डाग असलेली कॅप आणि बॅचही होता. ट्रायल न्यायालयात त्यांच्या या वस्तू पुरावा म्हणून जमा करण्यात आल्या होत्या. तेव्हापासून या दोन्ही वस्तू कोर्टाकडेच होत्या.


निवृत्तीच्या दिवशी या दोन्ही वस्तू परिधान करावं असं प्रतीप फिलिप यांना वाटलं आणि त्यांनी न्यायालयाकडे या वस्तू देण्याची मागणी केली. अर्थात त्यांच्या मागणीवर न्यायालयात बराच खल झाला. कोर्टानंही त्यांच्या भावना लक्षात घेऊन 1 लाख रुपयांच्या वैयक्तिक बॉन्डवर त्यांना या दोन्ही वस्तू काही दिवसांसाठी दिल्या. निवृत्तीच्या दिवशी फिलिप यांनी या दोन्ही वस्तू परिधान केल्या आणि 30 वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला. 28 ऑक्टोबरपर्यंत या दोन्ही वस्तू त्यांना परत कराव्या लागणार आहेत.