नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेने 20 फेब्रुवारीपासून एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा 50 हजार रुपये केल्यानंतर केवळ दोन दिवसांतच देशात पुन्हा चलनकल्लोळ जाणवण्यास सुरूवात झाली आहे.  त्यामुळे गरज असेल, तेवढेच पैसे काढा, असं आवाहन केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी केलं आहे.


सध्या देशातील अनेक भागातून एटीएममध्ये पैसे संपल्याची तक्रार येत आहे. ही स्थिती लक्षात घेऊन लोकांनी त्यांना हवे तेवढचे पैसे काढावेत, गरजेपेक्षा जास्त पैसे काढल्याने इतरांना पैसे मिळत नसल्याचं शक्तिकांत दास यांनी सांगितलं.

https://twitter.com/ANI_news/status/834270122860826624

एक फेब्रुवारीपासून बचत खात्यातून एका दिवसात 24 हजार रुपये काढण्याची मुभा देण्यात आली होती. आठवड्याला मात्र खात्यातून 24 हजार रुपयेच काढता येणार होते. विशेष म्हणजे व्यापाऱ्यांना दिलासा देत आरबीआयने चालू खात्यावरील सर्व निर्बंध मागे घेतले होते.

8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हजार आणि पाचशे रुपयांच्या चलनातील तत्कालीन नोटा बाद केल्या. नागरिकांना त्यांच्याकडील जुन्या नोटा बँकेत परत करण्यास किंवा बदलण्यास 30 डिसेंबर 2016 पर्यंतची मुदत देण्यात आली होती.

नव्या नोटांच्या तुटवड्यामुळे एटीएम आणि बँकेतून पैसे काढण्यावर मर्यादा घालण्यात आल्या होत्या. त्यानंतर एटीएम आणि बँकाबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

''एक हजारच्या नोटांविषयी काहीही योजना नाही''

नव्या पाचशे आणि दोन हजारच्या नोटा चलनात आल्यानंतर आता 1 हजारच्या नव्या नोटा चलनात येतील, अशी चर्चा आहे. मात्र अशी काहीही शक्यता नाही, असं शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केलं आहे. आरबीआयकडून सध्या पाचशे आणि त्यापेक्षा कमी किंमतीच्या नोटा जास्तीत जास्त छापण्यावर भर दिला जात आहे, असंही त्यांनी सांगितलं.

https://twitter.com/DasShaktikanta/status/834265950476181508

संबंधित बातम्या :


एटीएममधून दरदिवशी पैसे काढण्याची मर्यादा 24 हजारांवर


एटीएममधून पैसे काढण्यावरील मर्यादा फेब्रुवारी अखेर शिथील?


500-1000 च्या जुन्या नोटाबदलीसाठी RBI कडून ‘सेकंड चान्स’ ?


बचत खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा 13 मार्चपासून मागे