मुंबई : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी असलेली रिलायन्स लाईफ सायन्सेस ही आता कोविड 19 टेस्टसाठी आवश्यक आरटीपीसीआर किटची निर्मिती करणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे या किटच्या माधय्मातून फक्त दोन तासात कोरोना व्हायरसची लागण झाली आहे की नाही, याचा तपास लागणार आहे. सध्याच्या आरटीपीसीआर किटद्वारे कोरोना बाधित आहे की नाही याचा निकाल मिळण्यास किमान 24 तासांचा वेळ लागतो.


आरटीपीसीआर RT-PCR म्हणजे रियल टाईम रिवर्स ट्रान्समिशन पॉलिमिराज चेन रिअॅक्शन टेस्ट. या टेस्टद्वारे कोरोना व्हायरस SARS-CoV-2 ची लागण झाल्याचं निश्चित करता येतं. सध्या देशात अँटीजेन आणि आरटीपीसीआर या दोन टेस्ट केल्या जातात. अँटीजेन टेस्ट ही रॅपिड टेस्ट आहे, त्याचाही निकाल दोनेक तासात समजतो, मात्र अँटीजेन टेस्टद्वारे मिळालेले निष्कर्ष आरटीपीसीआरच्या तुलनेत कमी विश्वासार्ह मानले जातात.


रिलायन्स लाईफ सायन्सेसच्या जीवशास्त्रज्ञांनी कोरोना व्हायरसच्या शेकडो जीनोम्सचा अभ्यास करुन, एखाद्याला कोविड 19 ची लागण झालीय की हे तपासण्यासाठी आरटीपीसीआर किट विकसित केलं आहे. रिलायन्सने या किटचं नाव आर ग्रीन किट असं ठेवलंय. आयसीएमआरनेही या किटला अदिमान्यता दिल्याचं सांगितलं जात आहे. रिलायन्सच्या या आर ग्रीन किटद्वारे केलेल्या तापसणीचे निष्कर्ष 98.8 टक्के तंतोतंत असल्याचं आयसीएमआरने कळवल्याचं सांगितलं जातं. रिलायन्सने बनवलेलं हे आरटीपीसीआर किट हे पूर्णपणे भारतीय संशोधन असून ते वापरण्यासाठी अतिशय सुलभ असल्याचा दावा करण्यात आला आहे.


देशातील कोरोनाची सद्यस्थिती


कोविड-19 महामारीविरुद्ध भारत अतिशय सक्षमतेने लढा देत आहे. कोरोना रूग्ण बरे होण्याच्या जागतिक क्रमवारीमध्ये भारत अव्वल स्थानी असून, हे स्थान देशाने कायम राखले आहे. रूग्ण बरे होण्याच्या  आकड्याने आज 54 लाखांचा टप्पा (54,27,706) ओलांडला आहे. बरे झालेल्या रूग्णांचे जागतिक पातळीवरचे प्रमाण 21 टक्के आहे, तर  त्या एकूण रूग्णांमध्ये भारताचे हे प्रमाण 18.6 टक्के आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात 79,476 नव्या रूग्णांची नोंद झाली. नव्या रूग्णांपैकी 78.2 टक्के रूग्ण 10 राज्ये आणि  केंद्रशासित प्रदेशातले आहेत. महाराष्ट्रामध्ये जवळपास 16,000 नवीन रूग्णांची नोंद झाली. मात्र हे प्रमाण आधीपेक्षा कमी आहे. नवीन रूग्णनोंदीमध्ये केरळ दुस-या स्थानावर असून या राज्यात 9,258 नवीन रूग्ण आढळले. तर तिस-या क्रमांकावर असलेल्या कर्नाटकमध्ये नवीन 8000 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे.