अहमदाबाद : स्वतः स्थापना केलेल्या विद्यापीठातील विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी जयेश पटेलला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. बडोदा पोलिसांनी पारुल विद्यापीठाचा संचालक असलेल्या पटेलला मंगळवारी रात्री उशिरा बेड्या ठोकल्या.

 
बडोद्याच्या पारुल विद्यापीठात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने तीन दिवसांपूर्वी पोलिसांत बलात्काराची तक्रार नोंदवली होती. वैद्यकीय अहवालात तिच्यावर रेप झाल्याची पुष्टी मिळाल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला.

 
'विद्यापीठातील महिला रेक्टरच्या मदतीने पटेलने आपल्याला तीनवेळा बोलवून घेतलं. पहिल्या वेळी 15 जून रोजी त्याने मला चार तास बसवून ठेवलं. एकीकडे मला कॉलेजमधून काढून टाकण्याची धमकी दिली, तर त्याचवेळी फी माफ करण्याचं आमिषही दाखवलं.' अशी माहिती पीडितेने दिली आहे.

 

 

त्यानंतर दुसऱ्या वेळी म्हणजे 16 जून रोजी पटेलने रात्री बोलावून घेत आपल्यावर बलात्कार केल्याचं तिने तक्रारीत म्हटलं आहे. जेव्हा 17 तारखेला त्याने पुन्हा बोलावलं, तेव्हा हिमतीने मित्राच्या सहाय्याने बडोदा पोलिसांच्या हेल्पलाईनवर आपण तक्रार नोंदवली, असंही तिने सांगितलं.

 
मॉडेलचाही आरोप

 

मुंबईतील एका मॉडेलनेही पटेलवर छेडछाडीचा आरोप केला आहे. आपण पारुल विद्यापीठात शिक्षण घेत असताना पटेलने छेड काढली होती आणि एका हॉटेलमध्ये बलात्काराचा प्रयत्नही केला होता, असा आरोप तिने केला आहे.

 
कोण आहे जयेश पटेल?

 

66 वर्षीय जयेश पटेलने 2003 मध्ये पारुल विद्यापीठाची स्थापना केली होती. जयेश स्वतः होमिओपॅथिक डॉक्टर असून पूर्वी दीडशे रुपयांत गर्भपात करुन देत असे. गर्भपात केंद्रं बंद झाल्यानंतर त्याने विद्यापीठाची स्थापना केली.

 
राजकीय क्षेत्रातही पटेलचा दबदबा आहे. 2007 आणि 2012 मध्ये जयेश पटेलने काँग्रेसतर्फे निवडणूक लढवली होती. दोन्ही वेळा पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर त्याने भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र शारीरिक शोषणाचा प्रकार समोर आल्यानंतर भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वावरुन त्याचं निलंबन करण्यात आलं.