नवी दिल्ली : भारताचे चौदावे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. देशाचे मुख्य न्यायाधीश जे एस खेहर यांनी नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना दुपारी 12 वाजून 15 मिनिटांनी शपथ दिली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाच्या जनतेचे आभारही व्यक्त केले.

'मी एका छोट्याशा गावातून आलो आहे. मातीच्या घरात माझं पालनपोषण झालं. माझा प्रवास मोठा होता. मात्र हा प्रवास माझा एकट्याचा नसून देश आणि समाजाची ही कथा आहे' असं कोविंद शपथविधीनंतर म्हणाले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाच्या जनतेचे आभारही व्यक्त केले.

'देशातील विविधता हीच आपली ताकद आहे. आपण वेगवेगळे असलो, तरी आपल्यात एकजूट आहे. विविधतेच्या आधारावर आपण अद्वितीय ठरतो. देशात आपल्याला राज्य, क्षेत्र, पंथ, भाषा, संस्कृती आणि जीवनशैली अशा अनेक गोष्टींचा मिलाफ पाहायला मिळतो. आपण वेगवेगळे असलो, तरी एक आहोत.' असं म्हणतानाच कोविंद यांनी पोलिस, सैन्य आणि शेतकरी हे राष्ट्राचे निर्माते असल्याचं सांगितलं.

71 वर्षीय रामनाथ कोविंद यांच्यासोबत पत्नी सविता, भाऊ, भाचे-पुतणे आणि कुटुंबातील अनेक सदस्य
शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.

मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि रामनाथ कोविंद यांच्याकडून खुर्च्यांची अदलाबदल



रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतीपदाची शपथ, सरन्यायाधीश खेहर यांच्याकडून शपथबद्ध



संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रपती कोविंद यांचा शपथविधी सोहळा

रामनाथ कोविंद यांच्याकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली



राष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्याला उपराष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संसदेच्या दोन्ही सभागृहाचे खासदार उपस्थित होते. संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमानंतर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना सैन्याच्या तिन्ही दलातर्फे गार्ड ऑफ ऑनर देऊन निरोप दिला जाईल.

तत्पूर्वी रामनाथ कोविंद यांनी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली.

रामनाथ कोविंद देशाचे नवे राष्ट्रपती


काय आहे राष्ट्रपती कोविंद यांचा कार्यक्रम

  • सकाळी 10.30 वाजता राजघाटावर दर्शन

  • सकाळी 11.15 वाजता राष्ट्रपती भवनात आगमन

  • सकाळी 11.45 वाजता संसदेकडे रवाना

  • पाच खुर्च्यांपैकी मधल्या खुर्चीवर प्रणव मुखर्जी, दुसऱ्या खुर्चीवर कोविंद तर तिसऱ्या खुर्चीवर खेहर
    बसतील

  • दुपारी 12.15 वाजता शपथविधी सोहळ्याला सुरुवात

  • प्रणव मुखर्जी स्वतःच्या खुर्चीवरुन उठून कोविंद यांना तिथे बसवतील

  • शपथविधीनंतर लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन कोविंद यांना भाषणासाठी आमंत्रित करतील

  • प्रणव मुखर्जी हे कोविंद यांना राष्ट्रपती भवनात नेतील

  • राष्ट्रपती भवनात गार्ड ऑफ ऑनर

  • नवनिर्वाचित राष्ट्रपतींना 21 तोफांची सलामी

  • राष्ट्रपती कोविंद मावळते राष्ट्रपती मुखर्जी यांना नव्या निवासस्थानी (10 राजाजी मार्ग) सोडतील


राष्ट्रपती निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी काँग्रेसप्रणित यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांचा पराभव केला.

रामनाथ कोविंद यांना 66 % म्हणजेच 7 लाख 2 हजार 44 मतं मिळाली, तर मीरा कुमार यांना 34 % म्हणजेच 3 लाख 67 हजार 314 मतं मिळाली.

कोण आहेत रामनाथ कोविंद?

रामनाथ कोविंद यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1945 उत्तरप्रदेशच्या कानपूर जिल्ह्यातील परौख गावी जन्म.
कानपूर विद्यापीठातून एलएलबीपर्यंतच शिक्षण
1977 ते 1979 मध्ये दिल्लीच्या हायकोर्टात वकिली.
1994 आणि 2000 साली उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर नियुक्ती
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून काम पाहिलं
भाजप दलित मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष
8 ऑगस्ट 2015 पासून बिहारचे राज्यपाल म्हणून कार्यरत

संबंधित बातम्या :


अखेरच्या भाषणात देशवासियांना राष्ट्रपतींची भावनिक साद


राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना निरोप देण्यासाठी दिल्लीत खास कार्यक्रमाचं आयोजन