Ram Mandir: अयोध्या : देशाविसायांचं तब्बल 500 वर्षांपासूनचं स्वप्न पूर्ण झालं आणि प्रभू श्रीराम (Shree Ram) अयोध्येतील भव्य राम मंदिरात विराजमान झाले. काल (सोमवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते प्रभू श्रीरामाचा भव्य अभिषेक सोहळा पार पडला. अभिषेक सोहळ्यानंतर आज अयोध्येतील भव्य मंदिरात विराजमान झालेल्या प्रभू रामचंद्राचं दर्शन सर्वसामान्यांना घेता येणार आहे. रामभक्त आजपासून मंदिरात जाऊन श्रीरामाचं दर्शन घेणार आहेत. अभिषेक सोहळा संपन्न झाल्यापासूनच दर्शनासाठी रामभक्तांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या अयोध्येतील पारा 6 अंशावर आहे. अत्यंत कडाक्याच्या थंडीतही भाविकांनी श्रीरामाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे.
सोमवारी (22 जानेवारी) शुभ मुहूर्तावर श्रीरामाचा अभिषेक विधीवत संपन्न झाला आणि रामभक्तांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली. आजपासून देशातील प्रत्येकाला रामललाचं दर्शन घेता येणार आहे. रामललाचं दर्शन सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत घेता येणार आहे. मंदिरातील दर्शनाच्या वेळेबाबत बोलायचं झालं तर, लोकांना सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत प्रभू श्रीरामाचं दर्शन घेता येणार आहे. त्यानंतर दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत मंदिर बंद राहिल, त्यानंतर पुन्हा दुपाती 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत प्रभू श्रीरामाचं दर्शन घेता येणार आहे.
आरतीची वेळ काय असेल?
राममंदिरात दुपारी 12 वाजता प्रभू श्रीरामाची भोग आरती होणार असून संध्याकाळी 7.30 वाजताही आरती होणार आहे. यानंतर 8.30 वाजता शेवटची आरती करून प्रभू श्रीरामाची निद्रेची वेळ होईल, त्यानंतर मंदिर बंद होईल ते सकाळी 8 वाजता उघडेल. आरतीसाठी पास घ्यावे लागतील, ते ऑनलाईन आणि ऑफलाईन घेता येतील. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या वेबसाईट वर देण्यात आलेल्या माहितीनुसार, वैध सरकारी ओळखपत्र दाखवून श्री रामजन्मभूमी येथील कॅम्प ऑफिसमधून ऑफलाईन पास मिळवता येतो. ऑनलाईन पास srjbtkshetra.org या वेबसाईटवर उपलब्ध होतील.
प्रभू श्रीरामाची 51 इंचाची मूर्ती गर्भगृहात विराजमान
22 जानेवारी रोजी राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम संपन्न झाला. प्राणप्रतिष्ठेत 7 हजारहून अधिक लोकांनी सहभाग घेतला. राम मंदिर हे कोट्यवधी राम भक्तांच्या श्रद्धेचं प्रतीक आहे. म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवलेली मूर्ती अयोध्येतील भव्य मंदिरात विराजमान झाली. मंदिरात रामाची 51 इंचाची मूर्ती बसवण्यात आली आहे. या शिल्पामध्ये भगवान विष्णूचे सर्व दहा अवतार, भगवान हनुमान यांसह इतर हिंदू देवता आणि इतर प्रमुख हिंदू धार्मिक चिन्हे यांचाही समावेश आहे.
दिव्यांनी सजलं मंदिर
बहुप्रतिक्षित रामललाच्या मूर्तीच्या अभिषेक सोहळ्यानंतर सोमवारी संध्याकाळी राम मंदिरासह अयोध्येतील सर्व मंदिरं दिव्यांनी सजवण्यात आली. फटाक्यांच्या लखलखाटानं आकाश दिवाळीसारखं उजळून निघालं. देशाच्या इतर भागातही लोकांनी फटाके फोडून हा ऐतिहासिक क्षण साजरा केला. राम मंदिराच्या एका भिंतीवर दिवे लावून प्रभू राम आणि देवी सीता यांची चित्रं तयार करण्यात आली होती आणि मंदिराच्या मुख्य रचनेवर 'राम' हे नाव कोरण्यात आलं होतं.