नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत दिवसेंदिवस भरच पडत आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा ठोकला होता. याप्रकरणी केजरीवाल यांची ही केस वकील राम जेठमलानी लढत होते. मात्र, यापुढे आपण केजरीवाल यांचा हा खटला लढवणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.


‘केजरीवाल माझ्याशी खोटं बोलले, या खटल्याच्या सुनावणीदरम्यान, मी कोर्टात तेच सांगितलं जे केजरीवाल यांनी मला सांगितलं होतं. केजरीवाल यांच्या सूचनेनुसारच मी त्या शब्दाचा वापर केला होता. पण आता मी केजरीवाल यांची केस सोडली आहे. पुढील सुनावणीत मी या खटल्यात सहभागी नसेल. केजरीवाल यांनी नवा वकील शोधावा. मला असं वाटतं की, जेटलीशी त्यांची सेटलमेंट झाली असावी.' असं जेठमलानी यावेळी म्हणाले.

या खटल्याच्या सुनावणीदरम्यान, केजरीवाल यांच्या वतीन त्यांचे वकील राम जेठमलानी यांनी अरुण जेटली यांच्याविरुद्ध अपशब्दाचा वापर केला होता. यावर जेटलींनी कोर्टात पुन्हा एकदा केजरीवाल यांच्याविरुद्ध 10 कोटींचा दावा ठोकू असा इशारा दिला. यानंतर केजरीवाल यांनी दिल्ली हायकोर्टात याबाबत लेखी स्पष्टीकरण दिलं. त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की, 'मी माझ्या वकीलांना अपशब्द वापरण्यास सांगितलं नव्हतं.'

सुरुवातीला DDCA वादाप्रकरणी जेटलींनी केजरीवाल यांच्यावर कोर्टात खटला दाखल केला होता. पण 17 मे 2017 रोजी कोर्टात जेटलींविरुद्ध केजरीवाल यांचे वकील जेटमलानी यांनी कोर्टात अपशब्द वापरला होता.

दरम्यान, याप्रकरणी नेमून दिलेल्या वेळेत स्पष्टीकरण न दिल्यामुळे न्यायालयाने केजरीवाल यांना 10 हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे.

राम जेठमलानी यांनी केजरीवाल यांचा खटला सोडला असून त्यांना 2 कोटींचं बीलही पाठवलं आहे.