नवी दिल्ली : लोकसभेत लोक परीक्षा संशोधन विधेयकावरुन जोरदार चर्चा रंगली होती, सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाल्यानंतर मोठ्या गदारोळात हे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले. दुसरीकडे राज्यसभेत (Rajyasabha) वंदे मातरम या गीताच्या अनुंषगाने महत्त्वाचे दुरुस्ती विधेयक संमत झाले आहे. राज्यसभेत आज बुधवारी 'राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंध (दुरुस्ती) विधेयक 2026' मंजूर करण्यात आले. या विधेयकामुळे 'वंदे मातरम्' (Vande matram) या राष्ट्रीय गीताचा समावेश संबंधित कायद्याच्या कक्षेत करण्यात आला असून, आता राष्ट्रीय गीताचा अवमान करणाऱ्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे. 

देशात काही ठराविक घोषणांवर सातत्याने वाद होतात. त्यामध्ये, जय श्रीराम किंवा वंदे मातरम हे शब्द उच्चारण्यासाठी काही जणांकडून सक्ती केल्याचाही आरोप होतो. तर, कोणाच्या सांगण्यावरुन हे शब्द देशभक्तीचे प्रतिक कसे होऊ शकतात? असा सवालही विचारला जातो. मात्र, आता वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अवमान केल्यास फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, यासंदर्भातील विधेयक राज्यसभेत संमत झाले आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे प्रतिक म्हणून वंदे मातरम या गीताचे महत्त्व आहे. 

एकीकडे लोकसभेत मोठ्या गदारोळात पेपर फुटीसंदर्भातील लोक परीक्षा विधेयक संमत झाले. दरम्यान, राज्यसभेत 'राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंध (दुरुस्ती) विधेयक 2026' मंजूर करण्यात आले. विधेयकातील या दुरुस्तीमुळे 'वंदे मातरम्' या राष्ट्रीय गीताचा समावेश संबंधित कायद्याच्या कक्षेत करण्यात आला असून, राष्ट्रीय गीताचा जाणीवपूर्वक अवमान करणाऱ्या विशिष्ट कृत्यांना आता फौजदारी गुन्हा मानले जाणार आहे. या विधेयकानुसार, 'वंदे मातरम्'चा अपमान किंवा अवमान करणाऱ्या ठराविक कृत्यांवर कायदेशीर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे, आता वंदे मातरम या राष्ट्रीय गीतालाही राष्ट्रीय ध्वज आणि राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण मिळणार आहे.

विरोधकांचा सभात्याग

लोकसभाप्रमाणेच राज्यसभेतही विरोधकांच्या गदारोळात वंदे मातरम संदर्भातील या विधेयकावर चर्चा करण्यात आली. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी करत, राष्ट्रीय राजधानीत नीट (NEET) प्रश्नपत्रिका गळतीप्रकरणी आंदोलन करणाऱ्या निदर्शकांवर पोलिसांनी कथितपणे बळाचा वापर केल्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली. त्यानंतर, या विधेयकावरील चर्चेदरम्यान विरोधकांनी सभात्याग (वॉकआउट) केला. दरम्यान, बहुमताच्या जोरावर हे विधेयक मंजूर करण्यात आले. 

3 वर्षांपर्यंतची शिक्षा

दरम्यान, सध्या या कायद्याअंतर्गत राष्ट्रीय ध्वज, भारतीय राज्यघटना आणि राष्ट्रगीत 'जन गण मन' यांना कायदेशीर संरक्षण देण्यात आले आहे. नव्या दुरुस्तीनंतर 'वंदे मातरम्' या राष्ट्रगीतालाही या कायद्याअंतर्गत वैधानिक संरक्षण मिळणार आहे. प्रस्तावित कायद्यानुसार, 'वंदे मातरम्'च्या गायनात जाणूनबुजून अडथळा निर्माण करणे किंवा ते रोखणे, तसेच राष्ट्रगीताचा अपमान किंवा अनादर करणारी कोणतीही कृती हा दंडनीय गुन्हा मानला जाईल. अशा गुन्ह्यांसाठी कमाल तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.

हेही वाचा

गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?