नवी दिल्ली : भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बक्करवाला आनंदधाम आश्रमात सनातन संस्कृती जागरण महोत्सवात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून पाकिस्तानला इशारा दिला. भारतीय सैनिकांच्या साथीने देशांच्या सीमांची सुरक्षा निश्चित करणं ही संरक्षण मंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात तुम्हाला जे वाटत आहे तसं निश्चित होईल असेही राजनाथ सिंह म्हणाले. 

राजनाथ सिंह यांनी या कार्यक्रमात म्हटले की आपल्या देशाकडे जो वाकड्या नजरेनं बघेल त्यांना सडेतोड उत्तर देणे ही माझी जबाबदारी आहे. तुम्ही सर्व आपल्या पंतप्रधानांना चांगल्या प्रकारे जाणता, त्यांच्या कार्यशैलीशी आपण परिचित आहात. त्यांचं जोखीम उचलण्याचे कौशल्य तुम्हाला माहीत आहे. आपल्या देशाविरोधात जे उभे राहतील त्यांना उत्तर देण्याचे काम ते करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता त्यांच्या कार्यशैली संदर्भात देखील तुम्हाला माहिती आहे. मला तुम्हाला आश्वस्त करायचे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तुम्हाला जसं वाटतं तसं नक्कीच होईल, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं 

राजनाथ सिंह यांनी  बोलताना म्हटले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे लक्ष ठेवलं आहे. विकसित भारताचे स्वप्न त्यांनी देशवासियांपुढे ठेवलं आहे. हे आव्हान छोटं नाही मात्र हे आव्हान नक्कीच पूर्ण होईल. 

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिष्ठा वाढली हे सर्वांना स्वीकारावं लागेल. यापूर्वी आंतरराष्ट्रीय मंचावर भारताने कुठली गोष्ट मांडली तर भारताला जगभरात गांभीर्याने घेतलं जायचं नाही. तेव्हा भारत कमजोर देश आहे गरिबांचा देश आहे, असं म्हटलं जायचं. मात्र आता आंतरराष्ट्रीय मंचावर भारताने काही भूमिका मांडली तर ती सर्वजण समजून घेतात. 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आत्तापर्यंत अनंतनाग जिल्ह्यात 25 हून अधिक स्थानिक टुरिस्ट गाईडची चौकशी करण्यात आली. सुरक्षा यंत्रणांच्या अंदाजानुसार स्थानिक मदतीशिवाय असा हल्ला होऊ शकत नाही त्यामुळे कसून चौकशी सुरू आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारत जोरदार उत्तर देण्याची तयारी करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही संरक्षण दलाच्या प्रमुखांची चर्चा केलेली आहे आणि भारताच्या संरक्षण सज्जतेचा आढावा घेतला आहे. नरेंद्र मोदी यांनी हल्ल्याचा कट रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळेल, असा इशारा दिला होता. भारताकडून पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी देखील केली जात आहे.