नवी दिल्ली: देशात हायस्कूल पातळीवरच्या अभ्यासक्रमात शेती हा विषय बंधनकारक करा अशी मागणी काँग्रेस खासदार राजीव सातव यांनी लोकसभेत केली आहे. शेतीप्रधान अशी ओळख मिरवणाऱ्या देशात लोक शेतीला व्यवसाय म्हणून पाहायचं का नाकारतात, याचं आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे, असं प्रतिपादन करत त्यांनी लोकसभेत ही लक्षवेधी मांडली.

 

देशात महाविद्यालय स्तरावर कृषीसाठी काही अभ्यासक्रम, त्यासाठीची विद्यापीठंही आहेत. मात्र त्याकडे वळणाऱ्यांची संख्या तुलनेनं कमी आहे. हायस्कूलमध्येच हा विषय अंतर्भूत केला तर विद्यार्थ्यांमधे त्याबद्दल अधिक रूची निर्माण होईल, असं खासदार राजीव सातव यांनी म्हटलं आहे.

 

केवळ समावेश करून चालणार नाही, तर हा विषय बंधनकारक करायला हवा असं सातव यांचं म्हणणं आहे.

 

ज्या मराठवाड्यात दुष्काळाचं भीषण संकट गेल्या तीन वर्षात घोंगावत होतं, त्याच मराठवाड्यातल्या हिंगोलीमधून सातव हे खासदार आहेत. त्यामुळे त्यांच्या या प्रस्तावाकडे सरकार कसं पाहतं हे औत्सुक्याचं असेल.