इंदूर: इंदूरचे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशी याच्या हत्येपूर्वीचा एक महत्त्वाचा व्हिडिओ समोर आला आहे. 23 मे रोजी सकाळी 9.45 वाजता, मेघालयातील डबल डेकर ब्रिज परिसरात राजा आणि त्याची पत्नी सोनम रघुवंशी ट्रेकिंग करताना दिसतात. एका पर्यटकाने चुकून काढलेल्या व्हिडिओमध्ये सोनम पुढे-पुढे चालताना आणि राजा तिच्या मागे चालताना दिसत आहे. काही तासांनंतर याच ट्रेक दरम्यान निर्जन ठिकाणी तीन सुपारी किलरनी राजाची हत्या केली. व्हिडिओ सोशल मीडियावर एम. देवसिंह नावाच्या पर्यटकाने पोस्ट केला आहे. त्याने लिहिले की, "मी 23 मे 2025 रोजी मेघालयात ट्रेकिंगसाठी गेलो होतो. काल मी तो व्हिडिओ पाहताना लक्षात आले की, त्या दिवशी सकाळी 9.45 वाजता एक जोडपं ट्रेक करताना माझ्या कॅमेऱ्यात चित्रीत झालं. नंतर समजलं की हेच इंदूरचे राजा आणि सोनम रघुवंशी होते."
व्हिडिओमध्ये सोनम पांढऱ्या टी-शर्टमध्ये दिसते. जी नंतर घटनास्थळी सापडली. तिच्या हातात एक प्लास्टिकची पिशवी आहे, ज्यात रेनकोट असावा. या ट्रेकवेळीच सोनमचे तीन साथीदार त्यांचं पाठलाग करत होते. हे तिन्ही आकाश राजपूत, विशाल चौहान आणि आनंद कुर्मी हे सुपारी किलर असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. मेघालय पोलिसांनी या प्रकरणात मुख्य सूत्रधार सोनम रघुवंशी आणि तिचा प्रियकर राज कुशवाह, तसेच इतर तिन्ही आरोपींना अटक केली आहे. तपासानुसार, सोनम आणि राज कुशवाहने मिलून लग्नाआधीच राजाची हत्या करण्याचा कट रचला होता.
11 मे रोजी सोनम व राजा रघुवंशी यांचा विवाह झाला आणि 20 मे रोजी दोघे हनीमूनसाठी मेघालयात गेले. 23 मे रोजी दोघेही अचानक बेपत्ता झाले. 2 जून रोजी राजाचा मृतदेह खोल खाईतून सापडला आणि अखेर 9 जूनला सोनम गाझीपूरमध्ये सापडली. हा व्हिडिओ या हत्याकांडात एक महत्त्वाचा पुरावा ठरणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून, अधिक तपास सुरू आहे.
या व्हिडीओत काय आहे?
इन्स्टाग्राम युजर @m_devsing (देवेंद्र सिंह) याने हा व्हिडीओ आपल्या इन्स्टा पोस्टमध्ये शेअर करत दावा केला आहे की, हा राजा आणि सोनमचा शेवटचा जिवंतपणीचा व्हिडीओ असू शकतो. @m_devsing याने म्हटले आहे की, 23 मे 2025 रोजी तो मेघालयातील प्रसिद्ध डबल डेकर रूट ब्रिजला भेट देण्यासाठी गेला होता. याचवेळी त्याने एक व्हिडीओ शूट केला होता, जो नंतर पाहताना त्यात इंदूरमधील राजा आणि सोनम हे जोडपं दिसलं. व्हिडीओमध्ये सकाळी 9.45 वाजता सोनम आणि राजा डोंगर चढत असल्याचे स्पष्टपणे दिसते. तेव्हाच @m_devsing खाली उतरत होता, तर राजा-सोनम यांनी नोंगिरियाट गावात रात्र घालवून डोंगरावर चढाई सुरू केली होती. सोनमने परिधान केलेल्या पांढऱ्या शर्टचा उल्लेखही या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. याच शर्टचा तुकडा राजा रघुवंशीच्या मृतदेहाजवळ सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
देवेंद्र सिंहने पोस्टमध्ये म्हटले की, "हा व्हिडीओ पोलिस तपासात महत्त्वाचा ठरू शकतो. त्यातून हत्या घडण्याच्या काही तास आधीची स्थिती दिसून येते." शिवाय, त्याच्याकडे अजून एक व्हिडीओ असल्याचेही त्याने नमूद केले आहे, ज्यात इंदूरचे आणखी तीन व्यक्ती दिसत आहेत. हे तिघे राजा-सोनमच्या 20मिनिटे आधी डोंगर चढत होते, आणि त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राजा रघुवंशी यांचा 23 मे रोजी हत्या करून मृतदेह खाईत फेकण्यात आला होता. त्यांच्याच पत्नी सोनम रघुवंशी आणि तिचा प्रियकर राज कुशवाह यांनी तीन सुपारी किलरमार्फत ही हत्या घडवून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
इंदूरची सोनम आणि राजा रघुवंशीची थरारक घटना
इंदूर शहरात नुकतंच विवाहबंधनात अडकलेल्या नवविवाहित जोडप्याच्या हनिमूनच्या ट्रिपचा शेवट अत्यंत भयावह ठरला आहे. राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांचा विवाह 11 मे रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला होता. लग्नानंतर 20 मे रोजी हे दोघंही हनिमूनसाठी मेघालयातील शिलॉन्ग येथे गेले. मात्र 23 मेपासून दोघांचाही त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क तुटला होता, ज्यामुळे अपहरणाची शक्यता व्यक्त केली जात होती. दोन आठवड्यांच्या शोधानंतर, 2 जून रोजी शिलॉन्गमधील एका दरीत राजा रघुवंशीचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे सोनमच्या अपहरणाची चर्चा जोरात सुरू झाली. मात्र 9 जून रोजी सोनम स्वतःच पोलिसांसमोर हजर झाली आणि प्राथमिक चौकशीतच एक धक्कादायक सत्य उघड झालं. पोलिस तपासात समोर आलं की, राजाच्या हत्येचा कट सोनमनेच रचला होता. नेमका खून कशा कारणाने झाला, यामागे आर्थिक व व्यक्तिगत कारणं होती का, याचा तपास पोलीस करत आहेत.
