नवी दिल्ली : तिकीट न काढणाऱ्या बेसावध रेल्वे प्रवाशांची धरपकड करण्यासाठी काही वेळा टीसी साध्या वेशात येतात. मात्र यापुढे फक्त युनिफॉर्ममध्येच तिकीट चेक करण्याची मुभा टीसींना असेल.

सर्व आरपीएफ स्टाफ, तिकीट चेकर यांनी अधिकृत गणवेशातच चेकिंग करावं, असं रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं आहे. राजधानी दिल्लीत आयोजित इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये ते बोलत होते.

https://twitter.com/PiyushGoyalOffc/status/913287647082237953

तिकीट न काढणाऱ्या प्रवाशांच्या चेहऱ्यावरची खळबळ टिपून त्यांना मोक्याच्या क्षणी गाठण्यासाठी टीसी साध्या वेशात येणं पसंत करतात. गणवेशधारी टीसी दूरवरुनही ओळखता येतात, त्यामुळे तिकीट न काढणारे प्रवासी त्यांना चुकवू शकतात, असा दावा टीसींतर्फे केला जातो. मात्र गोयल यांनी युनिफॉर्मसक्तीचा निर्णय घेतला आहे.

गँगमनचे अपघात रोखण्यासाठी, त्यांच्या सुरक्षिततेसाठी एक किट तयार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. 1 नोव्हेंबरपासून रेल्वेचं नवं वेळापत्रक लागू होणार असून अनेक ट्रेन्सच्या प्रवासाच्या वेळेत घट होणार आहे. प्रत्येक फूड पॅकेटवर एमआरपी छापणं आवश्यक आहे, त्यामुळे कोणाकडूनही अतिरिक्त किंमत आकारता येणार नाही, असंही गोयल यांनी सांगितलं.

पाच हजारांपेक्षा जास्त मानवविरहित रेल्वे फाटकं वर्षभराच्या आत बंद केली जाणार आहेत. जास्त पैसे खर्च करावे लागले तरी सुरक्षेशी तडजोड केली जाणार नाही, असंही गोयल यांनी स्पष्ट केलं.