मुंबई : 'सेनेचे गुंड' सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पुनावाला यांना धमकी देत असल्याचं वक्तव्य करणाऱ्या राहुल कंवल यांनी माफी मागितली आहे. खोटं वक्तव्य बदनामीकारक असून याबाबत कारवाई करावी तसेच राहुल कंवल यांनी माफी मागावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी हे पत्र 'इंडिया टुडे ग्रुप'चे संस्थापक अरुण पुरी यांना लिहिलं आहे. त्यांनंतर राहुल कंवल यांनी ट्विटरच्या माध्यमातून माफीनामा सादर केला आहे. 


राहुल कवंल यांनी ट्वीट करत म्हटलं की, "काल अँकरिंग करताना मी सीरम इन्स्टिट्यूटला धमकी देणार्‍या नेत्याच्या व्हिडिओबद्दल बोललो होतो. हा व्हिडीओ राजू शेट्टी यांनी जारी केला होता. जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आहेत, शिवसेनेचे नेते नाहीत. माझ्याकडून झालेल्या गोंधळ आणि चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहे."






पत्रकार राहुल कंवल यांनी खळबळजनक आरोप करत म्हटलं होतं की, "अदर पुनावाला यांनी मला व्हिडीओ पाठवले आहेत, ज्यात शिवसेनेचे गुंडे त्यांच्या फॅक्टरीबाहेर उभे राहून धमकी देत होते आणि लसीची मागणी करत होते."


राहुल कंवल यांच्या दाव्यांनंतर शिवसेनेने 'इंडिया टुडे'चे संस्थापक अरुण पुरी यांना पत्र लिहून संबंधित अँकरवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यामध्ये लिहिलं की,  "तुमच्या वृत्तवाहिनीतील ज्येष्ठ निवेदकाने केलेल्या बनावट बातम्यांविषयी मी तुम्हाला लिहित आहे. राहुल कंवल यांनी आजच्या शोमध्ये लसीसाठी 'सेनेचे गुंड' अदर पुनावाला यांना धमकी देत असल्याचा दावा केला होता. ही बातमी पूर्णपणे चुकीची आणि बदनामीकारक आहे."