नवी दिल्ली : मतचोरी संबंधी सादर केलेली सर्व माहिती ही निवडणूक आयोगाने दिलेल्या कागदपत्रांच्या आधारेच करण्यात आली आहे, ती माहिती माझी नाही. त्यामुळे मी त्यावर शपथपत्र का देऊ? असा प्रश्न काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर थेट मतचोरीचे आरोप केले आहेत. त्यावर आयोगाने त्यांना स्वाक्षरी केलेले शपथपत्र सादर करण्याची सूचना दिली होती.

निवडणूक आयोगाच्या पवित्र्यावर बोलताना राहुल गांधी म्हणाले, “निवडणूक आयोगाने त्याच्याकडे असलेली सर्व माहिती त्यांच्या वेबसाइटवर टाकावी, सर्वांना कळेल. हा फक्त मुद्द्यांपासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे. ही समस्या केवळ बंगळुरूमध्येच नाही, तर अनेक मतदारसंघांत झाली आहे.”

भारताच्या लोकशाहीची दुर्दशा

विरोधी पक्षांचे 300 खासदार निवडणूक आयोगाला एकच दस्तऐवज देण्यासाठी जाणार होते, पण त्यांना रोखण्यात आले. कारण निवडणूक आयोगाला भीती आहे की, एवढे खासदार तिथे गेले तर निवडणूक आयोगाची खोटी बाजू उघडी पडेल असा आरोप राहुल गांधींनी केला.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, "ही लढाई आता केवळ राजकीय राहिलेली नाही, तर संविधान आणि ‘एक मतदार एक मत’ या तत्त्वासाठीची लढाई आहे. कर्नाटकमध्ये आम्ही स्पष्ट दाखवून दिले की, तिथे ‘मल्टीपल मॅन, मल्टीपल वोट’ झाले. पूर्ण विरोधक या अन्यायाविरुद्ध एकत्र लढत आहेत. आता आयोगासाठी हे लपवणे कठीण जाईल.”

इंडिया आघाडीच्या सहकाऱ्यांचे आभार

राहुल गांधींनी इंडिया आघाडीतील सर्व सहकारी खासदारांचे एकजुटीने मतचोरी विरोधातील लढ्यात सहभागी झाल्याबद्दल आभार मानले. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, ही केवळ राजकीय लढाई नाही, तर लोकशाही आणि मतदानाच्या अधिकाराच्या संरक्षणासाठीची लढाई आहे, आणि आपण सर्व मिळून ती जिंकू.

निवडणूक आयोगाविरोधात विरोधी पक्ष एकवटले

केंद्रामध्ये इंडिया आघाडीनं मोदी सरकारविरोधात एल्गार पुकारला. राहुल गांधींनी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारवर मतचोरीचा आरोप केल्यानंतर इंडिया आघाडी मैदानात उतरली. यावेळी पोलिसांनी मोर्चाला परवानगी न दिल्यानं आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार धुमश्चक्री पाहायला मिळाली. निवडणूक आयोगावर धडक देणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी आडकाठी केली, पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेतलं आणि पुन्हा संसदेत सोडलं. देशातील प्रत्येक मतदार स्वच्छ आणि निष्पक्ष मतदार यादीची मागणी करत असल्याचं यावेळी राहुल गांधींनी म्हटलं.

ही बातमी वाचा: