नवी दिल्ली आगामी लोकसभा निवडणुकीत ओबीसी मतदार निर्णायक भूमिका बजावणार असल्याची चर्चा सुरू असताना आज लोकसभेत त्याचे प्रतिबिंब दिसून आले. लोकसभेत आज महिला आरक्षण विधेयकावर चर्चा  (Womens Reservation Bill ) सुरू असताना काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ओबीसींना मिळणाऱ्या संधीबाबत प्रश्न उपस्थित केले. केंद्र सरकारच्या 90 सचिवांपैकी 3 सचिव ओबीसी प्रवर्गातील असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. तर, आपल्या भाषणात गृहमंत्री अमित शाह  (Amit Shah) यांनी भाजपचे 85 खासदार असल्याचे सांगत राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले. 


केंद्र सरकारमध्ये फक्त 3 ओबीसी सचिव


राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात म्हटले की, 90 सचिव सरकारला सांभाळत आहेत. आणि यापैकी किती ओबीसी येतात? फक्त 3 ओबीसी सचिव आहेत. ते बजेटच्या केवळ 5 टक्के नियंत्रित करतात. ही चर्चा भारतातील जनतेला सत्ता हस्तांतरित करण्याबाबत आहे. हा ओबीसी समाजाचा अपमान आहे. तुम्ही आजच विधेयक लागू करा आणि आजच महिलांना एक तृतीयांश आरक्षण द्या, अशी मागणी त्यांनी केली. जातनिहाय जनगणना करा अन्यथा आम्ही ती करू असेही राहुल गांधी यांनी म्हटले.


ओबीसींच्या मुद्यावर जोर 


राहुल गांधी यांच्या संपूर्ण भाषणात ओबीसी मुद्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. ओबीसी कोट्याशिवाय असलेले हे विधेयक अपूर्ण असून ओबीसी आरक्षण लागू करण्याची मागणी राहुल गांधी यांनी केली. 


राहुल यांनी म्हटले की, सरकार अनेक मुद्द्यांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न करते. यातील एक मुद्दा जात जनगणना आहे. विरोधी पक्षाने जात जनगणनेचा मुद्दा उपस्थित करताच भाजप अचानक इतर मुद्दे आणून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून ओबीसी समाज आणि भारतातील लोक दुसरीकडे पाहू लागतील याचे कारण मला समजत नसल्याचे त्यांनी म्हटले. 


अमित शाह काय म्हणाले?


अमित शाह यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. शाह यांनी आपल्या भाषणात म्हटले की, सरकार हे सचिव चालवतात. सरकार मंत्रिमंडळ चालवते. देश चालवणाऱ्या लोकांमध्ये फक्त तीन ओबीसी आहेत. मी म्हणतो देश सरकार चालवते. कॅबिनेट देशाची धोरणे ठरवते. या देशाची संसद ती करते. भाजपचे 29 टक्के खासदार म्हणजेच  85 खासदार ओबीसी आहेत. तुलना करायची असेल तर करा. केंद्रीय मंत्रिमंडळात 29 मंत्री ओबीसी आहेत. आम्ही ओबीसीतून पंतप्रधान दिला असल्याचे शाह यांनी सांगितले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :