Rahul Gandhi: बांगलादेश 0 टक्के आणि भारतीय गारमेंट्सवर 18 टक्के टॅरिफ; अमेरिकेनं करारात कापूस आयातीची अट घातली, तर देशापासून का लपवली? राहुल गांधींनी पुन्हा घेरलं
अमेरिकेसोबत झालेला व्यापार करार हा कापूस उत्पादक शेतकरी आणि गारमेंट्स उद्योगाला ‘धोका’ देणारा करार केल्याचा आरोप करत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर भ्रम पसरवत असल्याचा हल्लाबोल केला.

Rahul Gandhi: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारत-अमेरिका व्यापार धोरणात कापूस आणि गारमेंट्सवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यासह कॅबिनेटवर जोरदार हल्ला चढवला आहे. अमेरिकेसोबत झालेला व्यापार करार हा कापूस उत्पादक शेतकरी आणि गारमेंट्स उद्योगाला ‘धोका’ देणारा करार केल्याचा आरोप करत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर भ्रम पसरवत असल्याचा हल्लाबोल केला.
“18 टक्के टॅरिफ विरुद्ध 0 टक्के” राहुल गांधींचा थेट सवाल
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, बांगलादेशला अमेरिकेत गारमेंट्स निर्यातीवर 0% टॅरिफचा फायदा दिला जात आहे, मात्र त्यासाठी अट अशी आहे की बांगलादेशने अमेरिकन कापूस आयात करावा. याउलट भारताच्या गारमेंट्सवर 18% टॅरिफ लागू करण्यात आला आहे. संसदेत या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केल्यावर सरकारच्या मंत्र्यांनी दिलेले उत्तर राहुल गांधी यांनी उघड केले. मंत्र्यांचे म्हणणे होते की, “जर हाच फायदा भारताला हवा असेल, तर अमेरिकेकडून कापूस आयात करावा लागेल.” यावर राहुल गांधी यांनी सवाल उपस्थित करत विचारले की, ही बाब देशापासून आतापर्यंत लपवून का ठेवली गेली?
18% टैरिफ बनाम 0% - आइए समझाता हूं, कैसे झूठ बोलने में माहिर प्रधानमंत्री और उनकी कैबिनेट इसपर भ्रम फैला रहे हैं। और, किस तरह से वो भारत-अमेरिका व्यापार समझौते से देश के कपास किसानों और टेक्सटाइल एक्सपोर्टर्स को धोखा दे रहे हैं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 14, 2026
बांग्लादेश को अमेरिका में गारमेंट्स निर्यात पर 0%… pic.twitter.com/F4hi4OCHFj
पुढे आड अन् मागे विहीरसारखी स्थिती
राहुल गांधी यांनी या परिस्थितीला पुढे आड अन् मागे विहीर अशी उपमा दिली आहे. जर भारताने अमेरिकन कापूस आयात करण्याचा पर्याय स्वीकारला, तर देशातील कापूस शेतकऱ्यांचे नुकसान होईल. आणि जर तो पर्याय नाकारला, तर भारतीय टेक्सटाइल उद्योग 18 टक्के टॅरिफच्या ओझ्याखाली दबला जाईल, असे त्यांनी म्हटलं आहे. याशिवाय, बांग्लादेश भारताकडून कापूस आयात कमी किंवा बंद करण्याचे संकेत देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे भारतीय शेतकरी आणि वस्त्रोद्योग या दोन्ही क्षेत्रांवर दुहेरी संकट ओढवण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
“सरेंडर मोदी” राहुल गांधींचा हल्लाबोल
राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर थेट निशाणा साधत “नरेंद्र ‘सरेंडर’ मोदी” असा टोला लगावला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा करार राष्ट्रीय हिताचा नसून दबावाखाली केलेला निर्णय वाटतो, जो देशाच्या आर्थिक कणा असलेल्या दोन महत्त्वाच्या क्षेत्रांना धोक्यात टाकणारा ठरू शकतो, असेही त्यांनी म्हटलं आहे.
“कोट्यवधींच्या रोजगारावर घाव”
भारतामधील टेक्सटाइल उद्योग आणि कापूस शेती हे कोट्यवधी लोकांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. या क्षेत्रांवर परिणाम झाला, तर लाखो कुटुंबे बेरोजगारी आणि आर्थिक संकटात लोटली जातील, असा इशारा त्यांनी दिला. दूरदर्शी आणि राष्ट्रहित जपणारे सरकार असा करार करेल जो कापूस शेतकरी आणि टेक्सटाइल निर्यातदार अशा दोघांच्याही हितांचे संरक्षण करेल. मात्र, त्यांनी आरोप केला की मोदी सरकारने उलट असा करार केला आहे जो दोन्ही क्षेत्रांना “गंभीर धक्का” देऊ शकतो.
इतर महत्वाच्या बातम्या
























