नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नीट यूजी परीक्षा पेपरफुटीवरुन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला बोल केला. राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ पोस्ट करत 22 लाख विद्यार्थ्यांची फसवणूक झाली असून त्यांची मेहनत वाया गेल्याचं म्हटलं. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी या मुद्यावर एक शब्द देखील बोलले नाहीत, असं राहुल गांधी म्हणाले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना तातडीनं पदावरुन हटवलं जावं अन्यथा पंतप्रधानांनी त्याची जबाबदारी स्वीकारावी, असं राहुल गांधी यांनी म्हटलं.
22 लाख मुलांची फसवणूक झाली : राहुल गांधी
राहुल गांधी म्हणाले की नीटसाठी 22 लाख विद्यार्थ्यांनी दोन वर्ष दिवसरात्र मेहनत केली, ती मेहनत वाया गेली. पूर्ण देशाला माहिती आहे, व्हाटसअपवर परीक्षेच्या दोन दिवस अगोदर पेपर वाटण्यात आला. धर्मेंद्र प्रधान जी भारताचे शिक्षण मंत्री म्हणतात मला काही देणं घेणं नाही. कमिटीनं च्या सूचना दिल्या होत्या त्यांनी कचऱ्याच्या डब्यात फेकल्या, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
राहुल गांधी म्हणाले की, नीटच्या 22 लाख मुलांची फसवणूक झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर एक शब्द बोलत नाहीत. धर्मेंद्र प्रधान यांना हटवलं जावं, अन्यथा पंतप्रधानांनी स्वत: स्वीकराली पाहिजे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं.
राहुल गांधी यांचा हल्लाबोल सुरुच
राहुल गांधी यांनी नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर दोन विद्यार्थ्यांनी जीवन संपवल्याचा मुद्दा मांडत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. राहुल गांधी म्हणाले की भाजप सरकारमध्ये परीक्षा घोटाळा करणाऱ्यांना संरक्षण दिलं जातं. तर, मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागतोय, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरीच्या 21 वर्षीय ऋतिक मिश्रा आणि गोव्यातील एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येचा मुद्दा मांडला. परीक्षा रद्द झाल्यानं विद्यार्थी मानसिकदृष्ट्या खचले आहेत. हे विद्यार्थी परीक्षेमुळं पराभूत झाले नाहीत तरयांना एका भ्रष्ट पद्धतीनं मारलं आहे, या आत्महत्या नसून व्यवस्थेनं केलेली हत्या असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांन म्हटलं की 2015 ते 2026 या दरम्यान देशात 148 परीक्षा घोटाळे झाले आहेत. या दरम्यान 87 परीक्षा रद्द झाल्या आहेत तर 9 कोटी विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम झाला आहे. या प्रकरणांमध्ये केवळ एका प्रकरणात शिक्षा झाली आहे. राहुल गांधी यांच्या दाव्यानुसार 17 प्रकरणांमध्ये सीबीआय आणि ईडीनं 11 प्रकरणांमध्ये चौकशी केली मात्र, कोणालाच शिक्षा झाली नाही, असं राहुल गांधी म्हणाले.
परीक्षा घोटाळ्याला जबाबदार असणाऱ्या अधिकारी आणि मंत्र्यांविरोधात कोणताही कठोर कारवाई होत नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. एखाद्याला पदावरुन हटवलं गेल्यास लगचेच त्याला मोठ्या पदावर बसवलं जातं. राहुल गांधी म्हणाले की चोरी करणाऱ्यांना बक्षीस मिळतं आणि परीक्षा देणारे विद्यार्थी जीव गमावतात, असंही ते म्हणाले.
दरम्यान, पेपरफुटीमुळं रद्द झालेली नीट यूजी परीक्षा रद्द करावी लागली होती. आता पुन्हा नीट यूजी परीक्षा 21 जूनला आयोजित केली जाणार आहे.
