Rahul Gandhi: काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना मोदी आडनावावरुन केलेल्या टीकेमुळे गुजरातमधील सुरत कोर्टानं दोषी ठरवत दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. प्रकरण 2019 च्या लोकसभा निवडणुकीतलं आहे. या शिक्षेमुळे राहुल गांधींच्या खासदारकीवर काही परिणाम होणार का असा सवाल विचारला जात आहे. 


सगळे चोर मोदी नावाचे का असतात? या लोकसभा निवडणुकीतल्या वक्तव्यावरुन काँग्रेस खासदार राहुल गांधीना आज दोन वर्षाची शिक्षा झालीय. गुजरातच्या सुरत जिल्हा न्यायालयानं याबाबतचा निर्णय दिलाय. कर्नाटकमध्ये 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान राहुल गांधींनी प्रचारसभेत हे वक्तव्य केलेलं होतं. त्यानंतर गुजरातचे भाजप आमदार पूर्नेश मोदी यांनी या वक्तव्यावरुन संपूर्ण मोदी समाजाचा अपमान झाल्याचा दावा (Defamation Case)  केला होता. 


गेल्या चार वर्षांपासून ही केस कोर्टात सुरु होती. आता लोकसभा निवडणुकीला एक वर्ष उरलं असताना त्याचा निकाल आला आहे. राहुल गांधींना जामीनही कोर्टानं मंजूर केलाय. सोबत पुढचे 30 दिवस ही शिक्षा लागू होणार नाहीय. या काळात वरच्या न्यायालयात दाद मागण्याचा अधिकारही त्यांना देण्यात आलाय. 


भारतीय दंड संहितेच्या कलम 499, कलम 500 अंतर्गत राहुल गांधींवर मानहानीची केस दाखल करण्यात आली होती. अशा पद्धतीच्या क्रिमिनल डिफेमेशनच्या केसेसमध्ये जास्तीत जास्त दोन वर्षांची शिक्षा होत असते. ब्रिटीशांच्या काळातलं हे कलम रद्द करावं यासाठी पण याचिका दाखल झाल्या होत्या. पण 2016 मध्ये सुप्रीम कोर्टानं याचं डिक्रिमिनलायझेशन करायला नकार दिला होता. मतस्वातंत्र्याचा अधिकार स्वैराचाराच अधिकार होऊ शकत नाही असं तेव्हा कोर्टानं म्हटलं होतं. 


राहुल गांधींना या केसमध्ये दोन वर्षांची शिक्षा झाल्यानंतर त्यांच्या खासदारकीवर परिणाम होणार का याचीही चर्चा आहे. लोकप्रतिनिधीला कुठल्याही न्यायालयानं दोन वर्षांची शिक्षा ठोठावल्यास त्याचं सदस्यत्व धोक्यात येतं. पण राहुल गांधींना 30 दिवसांची मुदत कोर्टानं दिलेली आहे. या काळात त्यांना जामीन मिळाल्यास त्यांच्या सदस्यत्ववावर कुठलाही परिणाम होणार नाहीय. 


एकीकडे राहुल गांधींच्या वक्तव्यावरुन देशाची संसद दोन आठवडे बंद आहे. विदेशात जाऊन भारताचा अपमान केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तर दुसरीकडे निवडणूक प्रचारात केलेल्या वक्तव्यावरुन आता सुरत कोर्टाकडून त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली गेली आहे.


ही बातमी वाचा: