नवी दिल्ली: लोकसभेत पास करण्यात आलेलं आयकर संशधोन विधयेकाविषयी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींसह विविध पक्षांच्या 16 खासदारांनी आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जींची भेट घेतली. या विधेयकाविषयी त्यांनी आपली नाराजी राष्ट्रपतींकडे व्यक्त केली.


याविषयी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, 'कोणत्याही चर्चेशिवाय लोकसभेत आयकर संशोधन विधेयक बील पास करण्यात आलं. संपूर्ण देशात लोकांचा आवाज दाबण्यात येत आहे. लोकांमध्ये भीती आहे. त्यासाठीच आम्ही राष्ट्रपतीची भेट घेतली. लोकसभेच्या प्रथेनुसार कामकाज केलं जात नाही. लोकसभेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे.' असं म्हणत राहुल गांधींनी सरकारवर आरोप केला.

मात्र यावेळी मीडियाशी बोलताना राहुल गांधी फक्त याच विषयावर बोलले. काल त्यांचं ट्विटर अकाउंट हॅक झालं. यावर प्रश्न विचारला असताना याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. लोकसभेत कामकाज प्रथेनुसार होत नाही आणि हीच राष्ट्रपतींना सांगण्यासाठी आपण त्यांची भेट घेतली असं राहुल गांधी म्हणाले.

काय आहे आयकर सुधारणा विधेयक?

विरोधकांच्या गोंधळाला न जुमानता भाजपनं लोकसभेत आयकर कायदा सुधारणा विधेयक मंजूर करुन घेतलं. नोटाबंदीनंतर बाहेर आलेला काळा पैसा सरकारी तिजोरीत वळवण्यासाठी आयकर कायद्यात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

नव्या कायद्यानुसार नोटाबंदीनंतर एखाद्यानं स्वतःहून अघोषित रक्कम जाहीर केली तर 50 टक्के कर लावला जाईल. मात्र आयकर विभागाच्या कारवाईदरम्यान अघोषित रक्कम उघड झाली तर त्या रकमेवर 75 टक्के कर आणि 10 टक्के दंड वसूल केला जाईल.