Rahul Gandhi In New York: काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या अमेरिकेच्या (America) दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशांच्या लोकांशी भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. सोमवारी (05 जून) भारतीय वेळेनुसार, राहुल गांधींनी न्यूयॉर्कमध्ये NRI लोकांना संबोधित केलं.


आपल्या भाषणात बोलताना राहुल गांधी म्हणाले की, भारताची संस्कृती कोणाचाही द्वेष करणं किंवा कोणाचा अपमान करणं नाही. ते म्हणाले की, भारतीयत्वाचा अर्थ कोणाला मारणं, कोणाचा द्वेष करणं किंवा कोणाचाही अपमान करणं असा होत नाही. यासोबतच त्यांनी प्रेमाची गोष्टही सांगितली आणि ओडिशातील रेल्वे अपघाताची आठवणही सांगितली.


नेमकं काय म्हणाले राहुल गांधी? 


काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, "भारताच्या संस्कृतीमध्ये द्वेष नाही, प्रेम आहे. ज्याला आम्ही पुढे नेत आहोत." भारतीय संस्कृती, सभ्यता आणि प्रेम यावर चर्चा करताना ते पुढे म्हणाले की, "मी इथे माझी 'मन की बात' करण्यासाठी आलेलो नाही. मला तुमची 'मन की बात' ऐकण्यात अधिक रस आहे. त्यांचं काम द्वेष पसरवणं आणि आमचं काम प्रेम पसरवणं. आम्ही त्यांचं काम का करावं? आम्ही आमचं काम करू" 


राहुल गांधींनी दिलेलं आव्हान


यावेळी त्यांनी देशातील आव्हानांवरही भाष्य केलं. राहुल गांधी म्हणाले, "भारतातही आव्हानं आहेत. आजचा भारत, आधुनिक भारत... मीडिया आणि लोकशाहीशिवाय जगू शकत नाही. प्रेम आणि आपुलकीवर विश्वास ठेवणारे लोक अमेरिकेत आहेत. तुम्ही लोक इथे राहता पण तरिही 24 तास तुमच्या मनात भारताबाबत प्रेम असतं." त्याचवेळी कार्यक्रमादरम्यान ओडिशा येथील बालासोर येथे झालेल्या तीन रेल्वेंच्या अपघाताबाबत काही काळ मौन पाळण्यात आले आणि अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.


अमेरिकेत राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा 


राहुल यांनी अमेरिकेत एका सामुदायिक कार्यक्रमाला संबोधित केलं, ज्यामध्ये मोठ्या संख्येनं काँग्रेस समर्थक, पक्षाचे सदस्य, अधिकारी आणि स्थलांतरित समुदायाचे सदस्य एकत्र आले होते. या कार्यक्रमात न्यूयॉर्क शहराचे महापौर एरिक अॅडम्स यांचाही सहभाग होता.


अमेरिकेत भारतीय वंशाच्या लोकांना संबोधित करताना राहुल गांधींनी भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. अमेरिकेत राहुल गांधींनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर काँग्रेस तेलंगणा आणि इतर राज्यांतील निवडणुकीतही भाजपचा सुफडा साफ करेल, असा दावा केला. माजी काँग्रेस अध्यक्ष म्हणाले की, केवळ काँग्रेस पक्षच नाही तर भारतातील जनताही भाजपच्या द्वेषानं भरलेल्या विचारसरणीचा पराभव करणार आहे.