मुंबई : ‘मला मिठी मारण्याआधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना दहावेळा विचार करावा लागेल,’ असं उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना योगींनी हे वक्तव्य केलं.


 ‘राहुल गांधी तुमची गळाभेट घेण्यासाठी आले तर तुम्ही त्यांना भेटणार का?’ असा प्रश्न योगी आदित्यनाथ यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना योगींनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली.


 ‘मोदींची घेतलेली गळाभेट हा राहुल गांधींचा राजकीय स्टंट आहे. अशा पद्धतीच्या स्टंटला मी महत्त्व देत नाही. दुसऱ्याच्या डोक्याने काम करणारा व्यक्तीच अशी कृती करतो,’ असं म्हणत योगी आदित्यनाथ यांनी राहुल गांधींवर खोचक टीका केली.


आगामी लोकसभा निवडणुकीवर भाष्य


राहुल गांधींना पंतप्रधानपदाचा उमेदवार करण्याची मागणी काँग्रेमधून होत आहे. या मुद्द्यावर बोलताना योगींनी अनेक प्रश्न उपस्थित केले. ‘शरद पवार, अखिलेश यादव, मायावती यांना राहुल गांधींचे नेतृत्व मान्य आहे का? महाआघाडी झाल्यास त्याचं नेतृत्व कोण करणार?’ असा सवाल योगींनी केला.