मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे सध्या भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) करत असून त्यांच्या यात्रेचा टप्पा हा सध्या आसाममध्ये आहे. पण या यात्रेच्या वेळी आसाममधील शंकरदेव मंदिरात जाण्याची परवानगी नाकारण्यात आल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. आसाममधील नगांवमध्ये बोदोर्वा थान हे धार्मिक स्थान आहे. हे स्थान शंकरदेवाचे मंदिर देखील मानले जाते. बोदोर्वा थान हे मंदिर आसामचे संत श्री शंकरदेव यांचं जन्मस्थळ असल्याची मान्यता आहे. याच मंदिरात राहुल गांधी यांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी जाऊन पूजा करायची होती. पण त्यांना या मंदिरात जाऊन पूजा करण्यापासून थांबवण्यात आल्याचं राहुल गांधींनी म्हटलं.
यावर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, मला आज शंकरदेव यांच्या मंदिरात जाण्यापासून अडवण्यात आले. आम्हाला इथे पूजा करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला सांगितलं की, तुम्ही आतमध्ये जाऊन पूजा नाही करु शकत. बहुतेक आज एकाच व्यक्तीला मंदिरात जाऊन पूजा करु शकतो, असं म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला. आम्हाला मंदिरात जायचं आहे. मी काय गुन्हा केला की मला मंदिरात दर्शनासाठी जाऊ दिलं जात नाही, असा सवाल देखील राहुल गांधी यांनी उपस्थित केलाय.
दुपारनंतर दर्शन घेण्याची परवानगी
राहुल गांधी यांना दुपारी 3 नंतर बोदोर्वा मंदिरात जाण्याची परवागनी पोलिसांनी दिल्याची माहिती सध्या समोर येतेय. यावर व्यवस्थापकांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिराच्या बाहेर आणि आतही अनेक कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे या मंदिरातही अनेक कार्यक्रम होतील. यामुळे राहुल गांधी यांना दुपारी 3 नंतर मंदिरात जाण्याची परवानगी देण्यात आलीये.
11 जानेवारीपासून दर्शनासाठी प्रयत्न सुरू : जयराम रमेश
दरम्यान, 3 वाजल्यानंतर मंदिरात प्रवेश करण्याबाबत काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, राहुल गांधींना या मंदिरात दर्शन हवे होते. त्यासाठी आम्ही 11 जानेवारीपासून तिथे जाण्याचा प्रयत्न करत आहोत. आमचे दोन आमदारही मंदिर व्यवस्थापन समितीला भेटले आहेत. आम्ही 22 जानेवारीला सकाळी 7 वाजता तिथे येऊ असे सांगितले. त्यावेळी आमचे स्वागत करण्यात येईल असे देखील सांगण्यात आले होते. पुढे जयराम रमेश यांनी म्हटलं की, पण रविवार 21 जानेवारी रोजी आम्हाला सांगितलं की तुम्ही दुपारी 3 वाजेपर्यंत त्या मंदिरात जाऊ शकत नाही. पण 3 नंतर तिथे जाण्यास आम्हाला बऱ्याच अडचणी निर्माण होऊ शकतात.
हेही वाचा :