नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केरळमध्ये ध्वजारोहण केल्याप्रकरणी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी संघावर जोरदार निशाणा साधला आहे. सत्तेत आल्यानंतर राष्ट्रीय स्वयसेवक संघाला तिरंग्याला आठवण आली, अशा शब्दात राहुल गांधींनी हल्लाबोल चढवला.


राजधानी दिल्लीत विरासत बचाओ संमेलनात संबोधित करताना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मोदी सरकारवर जोरदार टीका केली. संघाला संविधान बदलायचं आहे, त्यामुळे या शक्तींविरोधात एकत्र मिळून लढण्याची गरज आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

संघाला संविधान बदलायचं आहे
आरएसएसच्या देशभक्तीवर निशाणा साधताना, राहुल गांधी म्हणाले की, "सत्ता मिळण्याआधी या संघटनेने कधीही तिरंग्याला सलाम केला नाही. प्रत्येक संस्थेत आरएसएसने आपल्या लोकांची नियुक्ती केली आहे. आरएसएसला संविधान बदलायचं आहे. एक व्यक्ती एक मत असं संविधानात लिहिलं आहे. पण संविधानाने दिलेले अधिकार आरएसएसला नष्ट करायचे आहेत. त्यांना संविधान बदलायचं आहे."

रवीशंकर प्रसाद यांचा पलटवार
राहुल गांधी यांच्या टीकेनंतर सत्ताधारी भाजपने पलटवार केला आहे. भाजपकडून केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला. एकेकाळी राहुल गांधी यांच्या आजी इंदिरा गांधी आणीबाणीच्या काळात 'कमिटेड ज्युडिशरी'बाबत बोलल्या होत्या. त्यामुळे अशी विधानं करणं राहुल गांधींनी शोभत नाही. ज्युडिशरी आणि मीडिया या संस्थांबाबत राहुल गांधींच्या विधानाचा भाजप तीव्र शब्दात विरोध करत आहे.

देशातील लोक संघाचा आदर करतात. आज भाजप 70 टक्के देशावर राज्य करते. आता राहुल गांधींनी ही गोष्ट समजत नाही म्हणून त्यांच्या दया येते. काँग्रेसच्या लोकांनी राहुल गांधींना देशाच्या राजकीय समज काय असते याचं शिकवण द्यावी, असंही रवीशंकर प्रसाद म्हणाले.