नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीच्या कर्नाटक दौऱ्यात त्यांच्या हेलिकॉप्टरशी घातपाताचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. एवढंच नाही तर काँग्रेसने याविरोधात कर्नाटक पोलिसात तक्रारही दाखल केली आहे. हेलिकॉप्टरमधील बिघाडामागे, आंतरराष्ट्रीय टॅम्परिंग असल्याची शंकाही काँग्रेसने व्यक्त केली आहे.
यादरम्यानच चीन दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेलिकॉप्टर बिघाडासंदर्भात राहुल गांधी यांना कॉल करुन विचारपूस केल्याची माहिती काँग्रेस सूत्रांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर असून आज ते चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत.
काय आहे प्रकरण?
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी काल (शुक्रवार) नवी दिल्लीहून दसॉल्ट फॉकन 2000 हे हेलिकॉप्टरने हुबळीला जात होते. परंतु हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड उद्भवल्याने ते हवेतच हेलकावे घेऊ लागलं. हेलिकॉप्टर लॅण्ड करताना वातावरणही स्वच्छ होतं. त्यामुळे हेलिकॉप्टर अचानक हेलकावे का घेऊ लागलं? असा प्रश्न काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरचे आकाशात हेलकावे, घातपाताचा संशय
हेलिकॉप्टरमध्ये राहुल गांधींसह त्यांचे निकटवर्तीय कौशल विद्यार्थीही होते. ते म्हणाले की, लॅण्डिंगच्यावेळी हेलिकॉप्टर अचानक डावीकडे झुकलं आणि हेलकावे घेऊ लागलं. त्याआधीही विमान हेलकावे घेत होतं, ही सामान्य बाब नाही.
वैमानिकाविरुद्ध गुन्हा
याबाबत काँग्रेस पक्षाकडून गुरुवारी कर्नाटकच्या पोलिस महासंचालकांकडे तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीच्या आधारे संबंधित वैमानिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी संबंधित हेलिकॉप्टर ताब्यात घेऊन वैमानिकाची चौकशीही सुरु केली असल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं आहे.
राहुल गांधींकडून वैमानिकांचे आभार
तर दुसरीकडे हवाई संचालनालय सूत्रांच्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यानंतर वैमानिकांनी याबाबत राहुल गांधींना सांगितलं. प्रवासादरम्यान उद्भवलेल्या अडचणीवर मात करुन हेलिकॉप्टरचं यशस्वी लॅण्डिंग केल्याने राहुल गांधींनी वैमानिकांचे आभारही मानले.