राफेल कराराशी निगडित कागदपत्रं संरक्षण मंत्रालयातून चोरीला : महाधिवक्ता
एबीपी माझा वेब टीम | 06 Mar 2019 03:30 PM (IST)
ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ प्रशांत भूषण यांनी सरकार राफेल कराराची कागदपत्रं लपवत असल्याचा आरोप केला. ही कागदपत्रं कोर्टात सादर करण्यास प्रशांत भूषण यांनी सांगतचा महाधिवक्त्यांनी राफेल कराराची कागदपत्रं चोरीला गेल्याचा दावा केला.
नवी दिल्ली : राफेल विमान कराराबाबत सुप्रीम कोर्टात दाखल पुनर्विचार याचिकेवर सुप्रीम कोर्टात खडाजंगी झाली. राफेल विमान कराराशी निगडीत कागदपत्रं संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेल्याचा दावा भारताचे महाधिवक्ता के के वेणुगोपाल यांनी सुप्रीम कोर्टात केला. ही अत्यंत संवेदनशील बाब असल्याचंही ते म्हणाले. ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ प्रशांत भूषण यांनी सरकार राफेल कराराची कागदपत्रं लपवत असल्याचा आरोप केला. ही कागदपत्रं कोर्टात सादर करण्यास प्रशांत भूषण यांनी सांगतचा महाधिवक्त्यांनी राफेल कराराची कागदपत्रं चोरीला गेल्याचा दावा केला. चोरी झालेली कागदपत्रं नंतर वर्तमानपत्रात छापून आली, असा दावा सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात केला गेला. शिवाय वर्तमानपत्रात छापून जनतेचं मत प्रभावित केलं जात असल्याचंही सरकारने म्हटलं. एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याने कागदपत्रं चोरली असावीत, असा अंदाज वेणुगोपाल यांनी व्यक्त केला. कागदपत्रं चोरी होऊन वर्तमानपत्रात कशी छापली गेली, याची चौकशी करुन माहिती द्या, असं कोर्टाने सरकारला सांगितलं. या प्रकरणाचा तपास सुरु असल्याची माहितीही महाधिवक्त्यांनी दिली.