चंदीगढ : आम आदमी पार्टीचे 7 खासदार पक्षाची साथ सोडून भाजपमध्ये दाखल झाले होते. राघव चढ्ढा यांच्यासोबत भाजपमध्ये जाणाऱ्या राजिंदर गुप्ता यांच्यावर पंजाब सरकारनं कारवाई केली आहे. पंजाबमधून राज्यसभा खासदार असलेल्या राजिंदर गुप्ता यांच्या ट्रायडंट ग्रुपच्या कारखान्यावर पंजाब प्रदूषण कंट्रोल बोर्डानं छापा मारला आहे. ट्रायडेंट ग्रुपच्या धौला येथील कारखान्यात प्रदूषण विभागाची नऊ वाहनं मोठ्या ताफ्यासह दाखल झाली. यामध्ये 9 अधिकारी दाखल झाले आहेत.   

Continues below advertisement

पंजाब प्रदूषण कंट्रोल बोर्डाचे अधिकारी अजूनही ट्रायडंट ग्रुपच्या कारखान्यात अजूनही असल्याची माहिती आहे. कारखान्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची बारकाईनं तपासणी केली जाते. कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय झालेल्या कारवाईमुळं कारखान्यात खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळं पंजाबच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या कारवाईकडे राजकारणाला जोडून पाहिलं जात आहे. पंजाब प्रदूषण कंट्रोल बोर्डानं  या कारवाईसंदर्भात माहिती दिलेली नाही. ही कारवाई नेमकी कोणत्या कारणामुळं करण्यात आली ते देखील समोर आलेलं नाही.   

राज्यसभा खासदार राजिंदरगुप्ता भाजपमध्ये गेल्यानं आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. आपच्या कार्यकर्त्यांनी गुप्तांविरोधात आंदोलन केलं होतं. चंदीगढमध्ये त्यांच्या घरावर गद्दार लिहिण्यात आलं होतं. चंदीगढ पोलिसांनी या प्रकरणी सेक्टर-3 मध्ये एक गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांकडून गुप्ता यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता.  

Continues below advertisement

राजिंदर गुप्ता पंजाबमधील श्रीमंत उद्योगपतींपैकी एक आहेत. ट्रायडंट ग्रुपचे संस्थापक आणि पद्मश्री पुरस्कार विजेते राजिंदर गुप्ता यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये जात नवा प्रवास सुरु केला आहे. आपच्या संजीव अरोरा यांनी विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर आम आदमी पार्टीनं राजिंदर गुप्ता यांना उमेदवारी दिली होती. ऑक्टोबर 2025 मध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत राजिंदर गुप्ता बिनविरोध विजयी झाले होते.