Punjab Flood: पंजाब सध्या गेल्या तीन दशकांमधील सर्वात मोठ्या पुराचा सामना करत आहे. राज्यातील सर्व 23 जिल्हे पुराचा तडाखा सहन करत आहेत. मुसळधार पाऊस, नद्यांचा पूर आणि धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पंजाबमधील प्रत्येक गाव उद्ध्वस्त झाले आहे.

शेतीला सर्वात मोठा फटका

या पुरामुळे पंजाबच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कृषी क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. आतापर्यंत सुमारे 1.48 ते 1.72 लाख हेक्टरवरील पिके नष्ट झाली आहेत. भात, कापूस आणि ऊस यासारखी प्रमुख पिके पूर्णपणे पाण्यात बुडाली आहेत. गुरुदासपूर हा सर्वात जास्त प्रभावित जिल्हा आहे, जिथे 40 हजार हेक्टरपेक्षा जास्त जमीन पाण्याखाली गेली आहे आणि 300 हून अधिक गावे उद्ध्वस्त झाली आहेत. जमिनीत गाळ साचल्याने पुढील पेरणीही धोक्यात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

जीवितहानी आणि विस्थापन

या पुरामुळे आतापर्यंत 43 लोकांचा बळी गेला आहे. हजारो कुटुंबे बेघर झाली आहेत आणि सुमारे 22 हजार लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. राज्यभरात 74 हून अधिक मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत, जिथे लोकांना तात्पुरता आश्रय दिला जात आहे. सैन्य, हवाई दल, नौदल, बीएसएफ आणि एनडीआरएफच्या पथके बोटी आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने मदत आणि बचाव कार्य करत आहेत.

शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे आश्वासन

मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राज्यात नुकसानाचे मूल्यांकन सुरू करण्याचे आदेश दिले आहेत आणि शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे आश्वासन दिले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव शाळा आणि महाविद्यालये 7 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. केंद्राच्या वतीने केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अमृतसर, गुरुदासपूर आणि कपूरथळा येथे भेट दिली. त्यांनी पंतप्रधानांना पिकांच्या नुकसानीचा अहवाल सादर करण्याबाबत बोलले. केंद्राने पंजाबमध्ये दोन उच्चस्तरीय पथके पाठवली आहेत, जी धरणे आणि नदीचे बंधारे मजबूत करण्यासारखी पावले सुचवतील.

इतर महत्वाच्या बातम्या