'हो, चला फुटीरतावाद्यांशी बोलुयात. हो, चला पाकिस्तानशी संवाद साधूयात. मात्र यावेळी चर्चा टेबलवर होऊ शकत नाही. आता युद्धभूमीवर उत्तर देण्याची वेळ आली आहे. आता हद्द झाली. श्रीनगर-जम्मू हायवेवर 18 (ट्वीट करतानाचा आकडा) सीआरपीएफ जवान आयईडी स्फोटात शहीद' असं ट्वीट गौतम गंभीरने केलं.
दक्षिण काश्मिरच्या अवंतीपुरा भागात गुरुवारी दुपारी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने सीआरपीएफ जवानांच्या बसवर आत्मघाती हल्ला केला होता. हा देशाच्या इतिहास सीआरपीएफ जवानांवर झालेला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जातो.
आदिल अहमद दार उर्फ वकास या दहशतवाद्याने हा सुसाईड अटॅक घडवला. आदिल गेल्या वर्षी दहशतवादी संघटनेत भरती झाला होता. आदिलने स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेने नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला, अशी माहिती आहे.
या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नसल्याचं ट्वीट पंतप्रधानांनी केलं.
गंभीरप्रमाणेच क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी या घटनेचा निषेध केला आहे. 'जम्मू काश्मिरमध्ये आपल्या झालेल्या भ्याड हल्ल्यात आपले सीआरपीएफचे शूर जवान धारातीर्थी पडले. दुःख व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे आहेत. जखमींची प्रकृती सुधारावी यासाठी शुभेच्छा' अशा भावना क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने व्यक्त केल्या आहेत.
याशिवाय क्रिकेटपटू सुरेश रैना, शिखर धवन, रिषभ पंत, प्रवीण कुमार, उन्मुक्त चंद, हरभजन सिंह, बॉक्सर विजेंदर सिंह, मनोज कुमार, कुस्तीपटू साक्षी मलिक यांनीही हल्ल्याचा निषेध करत शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.