नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस आणि त्यांची बहिण प्रियांका गांधींनी यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधींचा हा निर्णय धाडसी असल्याचं सांगत प्रियांका गांधींनी त्यांची पाठराखण केली आहे.


प्रियांका गांधी यांनी ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, "राहुल गांधींसारखं धाडस फारच कमी लोकांकडे असतं. मी तुझ्या निर्णयाचा मनापासून आदर करते."


राहुल गांधी यांचा राजीनामा
23 मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राहुल गांधी यांनी राजीनामा देणार असल्याचं सांगितलं. परंतु पक्षाचे नेते सातत्याने त्यांची समजूत काढत होते आणि राजीनामा परत घेण्याची विनंती करत होते. परंतु राहुल गांधी आपल्या भूमिकेवर ठाम राहत बुधवारी (3 जुलै) ट्विटरवर चार पानांचं पत्र लिहून काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचं जाहीर केलं.

काँग्रेसच्या चांगल्या भविष्यासाठी काही मोठे आणि कडक निर्णय घेणं गरजेचं असल्याचंही राहुल गांधींनी पत्रात नमूद केलं. तसंच "काँग्रेससाठी सेवा करण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे, ज्या पक्षाची मूल्य आणि आदर्शांनी देशाची सेवा केली आहे. मी देश आणि संघटनेचे आभार मानतो. जय हिंद" म्हणत राहुल गांधींनी आपल्या पत्राचा शेवट केला आहे.

काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाची निवड होईपर्यंत ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा यांच्याकडे पक्षाची धुरा सोपवण्यात आली आहे.