PM Modi: कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सीमावाद (Maharashtra Karnataka Border dispute) काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. महाराष्ट्रामध्ये सीमाभागा संदर्भात ठराव मंजूर केल्यानंतर कर्नाटकातील नेत्यांचा जळफळाट सुरू झाला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यानंतर आता तिथले मंत्री देखील बेताल वक्तव्य करत आहेत. अमित शाह यांच्या मध्यस्तीनंतर देखील वाद थांबलेला नाही. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात बेळगावचा दौरा करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात बेळगावचा दौरा करणार आहेत. सध्या महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये सुरु असलेल्या सीमावादावरून मोदींच्या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दरम्यान कर्नाटककडून होणाऱ्या अन्यायाविरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती पंतप्रधान मोदींसमोर गाऱ्हाणं मांडण्याची शक्यता आहे. कारण मोदींच्या भेटीसाठी एकीकरण समितीने पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवलं आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून हे पत्र पंतप्रधानांच्या सचिवांकडे वर्ग करण्यात आलं आहे.
महाराष्ट्र व कर्नाटक सीमाभागातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्यात विशेष समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी अपर पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था), तर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक या समितीचे सदस्य असतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत याबाबत नियोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्राच्या विधिमंडळात सीमा प्रश्नाचा ठराव झाल्यानंतर त्याचे पडसाद बेळगावात सुरू असलेल्या कर्नाटक विधिमंडळात उमटले आहेत. मुंबई केंद्रशासित करा अशी मागणी कर्नाटकचे उच्च आणि शिक्षणमंत्री सी. एन. अश्वथ्य नारायण यांनी केली. मुंबईत वीस टक्के कन्नडिग असल्याचा जावईशोध त्यांनी लावला आहे. बेळगाव केंद्रशासित करायची असेल तर आम्हालाही मुंबई केंद्रशासित करण्याची मागणी करता येते असे नारायण म्हणाले. इतकच नाही तर आम्ही शांतताप्रिय आहोत आम्ही कधीच महाराष्ट्रातील कन्नड जनतेला फुस लावत नाही. सीमाप्रश्न संपलेला असून याबद्दल चर्चा देखील करू नये असेही नारायण म्हणाले. यावर सीमा भागातील मराठी बांधवांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे
पुढच्या काही महिन्यांमध्ये कर्नाटक राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीमध्ये भाजपकडे कोणताही मुद्दा नसल्याने सीमावाद वारंवार काढला जात आहे. त्यामुळे केवळ सत्ता मिळावी या हेतूने दोन्ही राज्यांमध्ये अशांतता निर्माण करणे कितपत योग्य आहे, असा सवाल राजकीय वर्तुळातून केला जात आहे.