LPG Price Cut In 2023: नवीन वर्षात तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. नवीन वर्षात घरगुती गॅस सिलिंडरचे दर कमी (LPG Price Cut Likely) होऊ शकतात. नवीन वर्षात सरकारी तेल कंपन्या (Oil Marketing Companies) स्वयंपाकाच्या गॅसच्या (LPG) किमती कमी करण्याची घोषणा करू शकतात, अशी चर्चा आहे. सध्या कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट झाली आहे. ज्याचा फायदा सरकारी तेल कंपन्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या  किमती कमी करून ग्राहकांना देऊ शकतात.


LPG Price Cut In 2023 : कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या पण एलपीजी सिलिंडर स्वस्त नाहीच 


सध्या मुंबईत (LPG Price In Mumbai) 14.2 किलोचा एलपीजी सिलिंडरसाठी 1052.50 रुपये मोजावे लागतात, तर राजधानी दिल्लीत  (Delhi) 1053 रुपये आणि चेन्नईमध्ये 1068 रुपये. पाटणामध्ये 1151 रुपये, तर लखनौमध्ये 1090 रुपये द्यावे लागतील. सरकारी तेल कंपन्यांनी 6 जुलै 2022 नंतर एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. या काळात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. या काळात कच्च्या तेलाच्या किमती 30 टक्क्यांनी खाली आल्या आहेत.


LPG Price Cut In 2023 : 2022 मध्ये घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 150 रुपयांपर्यंत वाढली 


2022 मध्ये सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमती प्रति सिलेंडर सुमारे 150 रुपयांनी वाढवल्या आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबर 2021 मध्ये जेव्हा कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 85 डॉलर्सच्या आसपास होती, तेव्हा घरगुती स्वयंपाकाचा गॅस 899 रुपयांना उपलब्ध होता. सध्या कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 83 डॉलर्सच्या आसपास आहे. तर भारतीय बास्केटची किंमत प्रति बॅरल 77 डॉलर्सच्या आसपास आहे. यामुळेच सरकारी तेल कंपन्यांकडे घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात कपात करण्याचे कारण आहे.


LPG Price Cut In 2023 : राजस्थान सरकारच्या निर्णयामुळे केंद्र सरकारवर दबाव वाढला


दरम्यान, स्वयंपाकाच्या गॅसच्या दरवाढीवरून विरोधक मोदी सरकारवर चौफेर हल्ला चढवत आहेत. भारत जोडो यात्रेवर असलेले राहुल गांधी महागड्या स्वयंपाकाच्या गॅसवर सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत आणि 2014 मध्ये घरगुती स्वयंपाकाचा गॅस 414 रुपये प्रति सिलेंडरवर कसा उपलब्ध होता, याची आठवण करून देत आहेत. दुसरीकडे राजस्थानच्या काँग्रेस सरकारने 1 एप्रिल 2023 रोजी 500 रुपयांना सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले आहे, तर जयपूरमध्ये सध्याची किंमत 1056 रुपये प्रति सिलेंडर आहे. म्हणजेच राज्य सरकार लोकांना अर्ध्या किमतीत एलपीजी सिलिंडर उपलब्ध करून देणार आहे. राजस्थान सरकारच्या या निर्णयामुळे केंद्र सरकारवर दबाव वाढला आहे. त्यामुळेच नवीन वर्षात घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत कपात अपेक्षित आहे.