गुजरात सरकारने पाटीदार समाजाच्या 14 जणांची हत्या केली असून आमच्या मागण्याही मान्य केलेल्या नाहीत. त्यामुळे भाजपला मतदान करणार नाही, असं भाजप आमदार नलिन कोटडिया यांनी एबीपी न्यूजशी बोलताना जाहीरपणे स्पष्ट केलं.
पक्षाला माझ्यावर कारवाई करायची असती तर दोन वर्षांपूर्वीच केली असती. मला पक्षातून निलंबित केलं तरीही त्याची चिंता नाही, असंही कोटडिया यांनी सांगितलं.
तुम्ही भाजपच्या विरोधात आहात की रामनाथ कोविंद यांच्या, हा प्रश्नही कोटडिया यांना विचारण्यात आला. पण आपण भाजपच्या विरोधात असल्याचं कोटडिया यांनी स्पष्ट केलं. गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप आमदाराचं हे वक्तव्य भाजपसाठी चिंता वाढवणारं आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी 10 ते 5 या वेळेत संसद भवन आणि विधानसभांमध्ये खासदार आणि आमदार मतदानाचा हक्क बजावतील. या निवडणुकीत एका खास पद्धतीने तयार करण्यात आलेल्या पेनाने मतदान करण्यात येणार आहे.