नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाच्या अवमानना प्रकरणात झालेला एक रुपयाचा दंड प्रशांत भूषण भरणार की नाही याबद्दल उत्सुकता होती. मात्र आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत प्रशांत भूषण यांनी स्पष्ट केलेलं आहे की ते हा दंड भरणार आहेत. न्यायालयीन प्रक्रियेचा आपण आदर करतो आणि या संपूर्ण सुनावणीत आपण आधीही म्हटलं होतं. सुप्रीम कोर्ट जी शिक्षा देईल ती भोगायला मी तयार असेन आणि त्यानुसार हा दंड भरतोय मात्र तो दंड भरत असतानाच या प्रकरणामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करण्याबाबतही विचार सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या पत्रकार परिषदेत स्वराज अभियानचे योगेंद्र यादव हे देखील उपस्थित होते.
प्रशांत भूषण यांनी पत्रकार परिषदेत सुरूवातीच्या संबोधनात राजीव धवन, दुष्यंत दवेंचे आभार मानले. या प्रकरणात ॲटर्नी जनरल वेणुगोपाल यांचा उल्लेख राहून गेल्याचं मान्य केलं. बऱ्याच दिवसानंतर या पदावरच्या व्यक्तीने आपल्या अंतरात्म्याचा आवाज प्रखरपणे मांडला याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
योगेंद्र यादव यांनी अभिव्यक्ति स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या लोकांसाठी 1 रूपया दान करण्याचं आवाहन या वेळी केले. यादव म्हणाले, या माध्यमातून राष्ट्रीय निधी तयार करण्याचा संकल्प आहे. या निधीचा उपयोग ते कोर्टाची लढाई लढण्यासाठी ज्यांना पैशांची उणीव भासते त्यांना या माध्यमातून मदत करणार आहे.
काय आहे प्रकरण?
ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. 27 जून रोजी करण्यात आलेल्या एका ट्वीटमध्ये प्रशांत भूषण यांनी 4 माजी सरन्यायाधीशांना हे लोकशाहीच्या हत्येत सहभागी असल्याचे वक्तव्य केलं होतं. तसेच काही दिवसांपूर्वी सरन्यायाधीश शरद बोबडे हे नागपूरमधील राजभवनात हार्ले डेव्हिडसन मोटारसायकलवर स्वार झाल्याचं एक छायाचित्र प्रसिद्ध झालं होते. त्यावर प्रशांत भूषण यांनी उपहासात्मक टिप्पणी केली होती. प्रशांत भूषण यांच्या ट्वीटची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस बजावली होती.
संबंधित बातम्या :