मुंबई :भारतानं ऑपरेशन सिंदूर द्वारे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणांवर हल्ले करत ते उद्धवस्त केले. केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठकीत माहिती देत म्हटलं की ऑपरेशन सिंदूर द्वारे केलेल्या हल्ल्यात 100 जणांचा मृत्यू झाला. यानंतर पाकिस्ताननं भारताच्या 15 लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र एस-400 एअर डिफेन्स सिस्टीमनं पाकिस्तानच्या एच क्यू -9 या एअर डिफेन्स सिस्टीमला उद्धवस्त केलं. यानंतर देखील पाकिस्तानची वळवळ थांबलेली नाही. पाकिस्ताननं भारतावर ड्रोन, मिसाईल आणि हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केला. राजस्थानमध्ये भारतानं पाकिस्तानचं एफ-16 हे विमान पाडलं. भारतानं पाकिस्तानच्या विमानाच्या पायलटला देखील ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मोठी मागणी केली आहे.
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
अमेरिकेनं पाकिस्तानला एफ -16 विमानं कठोर शेवटच्या वापराच्या निर्बंधासह दिलं होतं. अमेरिकेनं यासंदर्भात जो करार केला होता त्यातील नियमांनुसार भारताविरुद्ध आक्रमक अभियानासाठी पाकिस्तान अमेरिककडून खरेदी केलेल्या शस्त्रांचा वापर करु शकत नाही. मात्र, पाकिस्ताननं भारताविरोधात अमेरिकेकडून खरेदी केलेल्या F-16 चा वापर केला आहे. हे नियमांचं उल्लंघन आहे, प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी हा मुद्दा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेच्या सरकारकडे प्राधान्यानं मांडावा. पाकिस्तान आणि त्याचे नापाक इरादे जगापुढं आणायला हवेत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
भारताने पाकिस्तानच्या 16 शहरांवर हल्ला
भारताने पाकिस्तानच्या इस्लामाबादसह लाहोर, सियालकोट सारख्या 16 शहरांवर हल्ला केला आहे. एकीकडे वायू दलाचा आणि लष्कराचा हल्ला तर दुसरीकडे नौदलानेही हल्लाबोल केला आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
तणाव वाढवू नका, अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलेला आहे. भारतानं पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिलं असून इस्लामाबाद ते कराचीपर्यंत स्ट्राईक केले आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत. अजून तणाव वाढवू नका, असं अमेरिकेनं पाकिस्तानला सांगितलंय.सौदी अरेबियाचे विदेश मंत्री इस्लामाबादला जाणार असून पाकिस्तानशी चर्चा करुन त्यांना ताळ्यावर आणणार का हे पाहावं लागेल.
सांबा सेक्टरमधील दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव उधळण्यात आला आहे. बीएसएफ आणि दहशतवाद्यांमध्ये सांबा खोऱ्यात चकमक झाली. यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव हाणून पाडण्यात आला आहे.