PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी (4 जुलै 2022 ) आंध्रप्रदेशातील भीमावरम आणि गुजरातेतील गांधीनगर येथे भेट देणार आहेत. सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास, पंतप्रधान भीमावरम येथे प्रख्यात स्वातंत्र्यसैनिक आलुरी सीताराम राजू यांच्या वर्षभर चालणाऱ्या 125 व्या जन्मशताब्दी सोहळ्याचे उद्घाटन करतील. त्यानंतर दुपारी साडेचार वाजता पंतप्रधान गांधीनगर येथे डिजिटल इंडिया सप्ताहाचे उद्घाटन करणार आहेत.
भीमावरममध्ये पंतप्रधान मोदी -
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावाचा भाग म्हणून, स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाची न्याय्य दखल घेऊन त्यांच्याबद्दल देशभरातील लोकांना जागृत करण्याबद्दल कटीबद्ध आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी भीमावरम येथे प्रख्यात स्वातंत्र्यसैनिक आलुरी सीताराम राजू यांच्या वर्षभर चालणाऱ्या 125 व्या जयंती सोहळ्याचे उद्घाटन करतील. पंतप्रधान आलुरी सीताराम राजू यांच्या 30 फुटी कांस्यपुतळ्याचे अनावरणही करतील. 4 जुलै 1897 रोजी जन्मलेले अलुरी सीतारामा राजू यांचे स्मरण पूर्व घाटांतील आदिवासी जमातीच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ब्रिटिशांविरोधात दिलेल्या लढ्यासाठी केले जाते. 1922 मध्ये सुरू करण्यात आलेल्या राम्पा बंडांचे नेतृत्वही त्यांनी केले होते. त्यांचा उल्लेख स्थानिकांकडून मन्यम वीराडु (जंगलांचा नायक) म्हणून केला जातो.
जयंतीनिमित्त वर्षभर चालणाऱ्या सोहळ्याचा भाग म्हणून सरकारने अनेक उपक्रमांचे आयोजन केले आहे. आलुरी सीताराम राजू यांचे जन्मगाव विजयनगर जिल्ह्यातील पांडरंगी आणि राम्पा बंडाला 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल चिंतापल्ली पोलिस ठाणे (याच ठाण्यावर हल्ल्याने राम्पा बंडाची सुरूवात झाली होती) पुनर्प्रस्थापित केले जाईल. सरकारने मोगाल्लु येथे अलुरी ध्यान मंदिरांचे बांधकाम करण्यास तसेच अलुरी सीतारामा राजू यांचा ध्यानमुद्रेतील पुतळाही उभारण्यास मंजुरी दिली आहे. तसेच तेथे भित्तीचित्रे आणि एआय प्रणाली द्वारे स्वातंत्र्यसैनिकाच्या आयुष्याची कथा चितारली जाईल.
गांधीनगरमध्ये पंतप्रधान -
पंतप्रधान गांधीनगर येथे डिजिटल इंडिया सप्ताह 2022 चे उद्घाटन करणार असून त्याची संकल्पना नवीन भारताच्या तंत्रज्ञान दशकाला उत्प्रेरक बनवणे ही आहे. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान अनेक डिजिटल उपक्रमांचे उद्घाटन करणार असून तंत्रज्ञानाची सहज उपलब्धता, जीवन सुखमय करण्यासाठी सेवा वितरण सुनियोजित करणे आणि स्टार्ट अप्सना चालना देण्याचा या सप्ताहाचा उद्देष्य आहे. डिजिटल इंडिया सप्ताह 2022 4 जुलै ते 6 जुलै दरम्यान गांधीनगरमध्ये प्रत्यक्ष कार्यक्रम होतील. डिजिटल इंडियाची जयंती साजरी केली जाईल आणि आधार, यूपीआय, कोविन, डिजीलॉकर आदी सार्वजनिक डिजिटल मंचांमुळे नागरिकांचे जीवनमान सुखमय झाले आहे, याचे प्रदर्शन केले जाईल.
पंतप्रधान 'डिजिटल इंडिया भाषिणीची' सुरूवात करणार असून भारतीय भाषांमध्ये इंटरनेट आणि डिजिटल सेवांची सहज उपलब्धता त्यामुळे शक्य होणार आहे, ज्यात ध्वनीवर आधारित सहज प्रवेश तसेच भारतीय भाषांमध्ये आशयाची निर्मिती करण्यास मदत यांचा समावेश आहे. भारतीय भाषांसाठी, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित भाषा तंत्रज्ञान उभारण्यासाठी प्रमुख हस्तक्षेप हा बहुभाषक डेटाबेस तयार करणे हा असेल. डिजिटल इंडिया भाषिणीमुळे भाषादान या क्राऊड सोर्सिंग उपक्रमाद्वारे लोकांचा हे डेटा संच उभारण्यात व्यापक सहभाग शक्य होणार आहे.
पंतप्रधान Indiastack.global या प्रमुख प्रकल्पांच्या जागतिक कोषाचेही उद्घाटन करतील. इंडिया स्टॅक अंतर्गत आधार, यूपीआय, डिजीलॉकर, कोविन लसीकरण मंच, गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस (GeM), दीक्षा मंच आणि आयुषमान भारत डिजिटल हेल्थ मिशन हे प्रमुख प्रकल्प भारतात अमलात आले असून त्यांचा समावेश या कोषात आहे. ग्लोबल पब्लिक डिजिटल गुड्स कोषात भारताच्या या प्रस्तावामुळे भारताला लोकसंख्या स्केलवर डिजिटल संक्रमण प्रकल्प उभारण्यात आघाडीचा नेता म्हणून स्थापित करण्यास मदत होणार आहे. अशा तांत्रिक उपाययोजनेकडे उत्सुकतेने पहाणार्या इतर देशांनाही याची आत्यंतिक मदत होणार आहे.