मुंबई:  देशाचे पंतप्रधान नरेद्र मोदी (PM Modi)  यांना आज मातृवियोगाच्या दु:खाला सामोरं जावं लागलं. पण या अतीव दु:खाच्या काळातही पंतप्रधानांनी जी कर्तव्य तत्परता दाखवली तीही आदर्श अशीच म्हणावी लागेल. कर्मयोग्याप्रमाणे पंतप्रधान आज आपली सारी कर्तव्य पार पडताना दिसले. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांचं आज पहाटे वयाच्या 100 व्या वर्षी निधन झालं. पण या दु:खाच्या प्रसंगातही पंतप्रधानांनी त्यांच्या कर्तव्यभावनेचा विसर पडू दिला नाही. अंत्यसंस्कारासाठी भल्या पहाटेच पंतप्रधान दिल्लीहून अहमदाबादला रवाना झाले. अंत्यविधीचे सारे सोपस्कार पार पाडले आणि तिथूनच ते अहमदाबादच्या राजभवनाकडे रवाना झाले. त्यानंतर  पश्चिम बंगालमधल्या वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटनला त्यांनी ऑनलाईन हजेरी लावली. प्रत्यक्ष उपस्थितत न राहिल्यामुळे त्यांनी बंगालच्या जनतेची माफी मागितली. हावडा ते न्यू जलपाईगुडी वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  हिरवा झेंडा दाखवला आहे. आईवर अंत्यसंस्कार केल्यानंतर पंतप्रधान मोदी लगेचच  कामाला लागले. पश्चिम बंगालच्या विविध कामांचं केलं लोकार्पण केले. सातव्या वंदे भारत रेल्वेला  हिरवा झेंडा दाखवला


 दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधानांच्या आईची तब्येत खालावल्याची बातमी होती. बुधवारीच पंतप्रधान अहमदाबामधल्या यू एन हॉस्पिटलमध्ये तातडीनं पोहचले होते. त्यावेळीही दीड तास ते हॉस्पिटलमध्ये होते. त्यानंतर तब्येत स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितल्यावर ते पुन्हा दिल्लीत आले होते. पण आज पहाटे साडेतीन वाजता हिराबेन यांच्या दु:खद निधानाची वार्ता कानावर आली. पंतप्रधान मोदी यांनीच ट्विट करुन ही माहिती देशवासियांना दिली. 


 आईचे निधन झाले तरी पंतप्रधानांच्या नियोजित कार्यक्रमात खंड पडणार नाही असे पंतप्रधान कार्यालयातून सांगण्यात आलं होतं. बंगालमध्ये वंदे भारत ट्रेनची सुरुवात आणि त्यानंतर गंगा कौन्सिलची बैठक असे दोन नियोजित कार्यक्रम होते. प्रत्यक्ष उपस्थिती लावू शकले नाहीत तरी पंतप्रधानांनी ऑनलाईन हजेरी लावली. शिवाय निधनानंतर परिवाराकडून जो संदेश देण्यात आला त्यातच सर्वांनी आपली कामं करत राहा, तीच हिराबेन यांना खरी श्रद्धांजली असेल असं म्हटलं. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईचे भावनिक संबंध यांचं दर्शन अनेकदा देशवासियांना झालं आहे. पण आईनेच दिलेल्या कर्तव्य तत्परतेचा धडा पंतप्रधानांनी इतक्या कठीण प्रसंगतातही अंमलात आणला. एका मुलाचं कर्तव्य बजावल्यानंतर पंतप्रधान म्हणून देशाचं कर्तव्य बजावण्यासाठीही ते लगेच सज्ज झाले.