लखनऊ: विजयादशमीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज लखनऊच्या लक्ष्मणनगरीतील रामलीला कार्यक्रामला उपस्थिती लावली. यावेळी बोलताना त्यांनी पाकिस्तानला लक्ष्य करुन दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्याला सोडणार नसल्याचा पुनरुच्चार केला.
पंतप्रधान म्हणाले की, आज जगातील दहशतवादाच्या रक्षसाचा नाश करण्यासाठी मानवतावादी शक्तींना एकत्रित होण्याची गरज आहे. दहशतवादाला नष्ट करण्यासाठी, त्याला खतपाणी घालणाऱ्याचाही नाश केला पाहिजे, अशी टीका त्यांनी पाकिस्तानचं नाव न घेता केली.
मोदी म्हणाले की, दहशतवादामुळे अनेक निरपराध्यांना आपला जीव गमवावा लागत आहे. दहशतवाद हा मानवतावादाचा सर्वात मोठा शत्रू बनला आहे. दहशतवादी मानवतावाद्यांना नष्ट करत आहेत. त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची गरज आहे.
त्यांनी आपल्या भाषणात रामायणाचा संदर्भ देऊन म्हणाले की, दहशतवादाविरोधातली पहिली लढाई जटायूने लढली. एका स्त्रीच्या रक्षणासाठी जटायू रावणासोबत युद्ध केलं. तेव्हा दहशतवादाविरोधात लढताना आपल्याला प्रभू श्रीराम होणे जमलं नाही, तरी जटायूची भूमिका आपण नक्की साकारु शकतो. यासाठी 125 कोटी देशवासियांनी परिसरातील छोट्या-छोट्या हलचालींवर बारकाईने नजर ठेवण्याची गरज आहे.
ते म्हणाले की, प्रभू श्रीराम मानवतवादाचं प्रतिनिधित्व करताता. तर रावण दहशतवादाचं प्रतिनिधित्व करतो. रावणाशी लढडं म्हणजेच दहशतवादाशी दोन हात करणं असल्याचंही ते यावेळी म्हणाले.
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात लोकमान्य टिळकांचा उल्लेख करुन ज्याप्रमाणे लोकमान्य टिळकांनी सार्वजानिक गणेशोत्सवाचा उत्सव बनवला. त्याचप्रमाणे रामलीला कमिटीनेही एक प्रेरणाश्रोत रामलीलेचे आयोजन केले पाहिजे अशी इच्छाही व्यक्त केली.