नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लस आणि लसीकरण मोहिमेवर आढावा बैठक घेतली. या बैठकीला कोरोना टास्क फोर्सचे अधिकारी व पीएमओचे अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधानांनी आतापर्यंतच्या झालेल्या लसीकरणाची आणि लसींची उपलब्धता तसेच येत्या काही महिन्यांत राज्यांना लसींचा पुरवठा यासह लसीकरण मोहिमेच्या संभाव्य कालवधीची माहिती घेतली.


देशात 21 जूनपासून सुरू झालेल्या मोफत लसीकरण मोहिमेमध्ये 5 दिवसात दररोज 70 लाखांच्या गतीने पाच दिवसांत 3.5 कोटींपेक्षा जास्त लसी दिल्या गेल्या आहेत. 21 जून रोजी, जेव्हा लसीकरण मोहिमेचा नवीन टप्पा सुरू झाला तेव्हा  एकाच दिवसात 85 लाखाहून अधिक लस देण्यात आल्या. या दिवशी मध्य प्रदेशात सुमारे 17 लाख लोकांना लस दिल्याची नोंद झाली. उत्तर प्रदेशनेही जून महिन्याच्या लसीकरणाचं लक्ष्य सहा दिवस आधीच गाठलं. मध्य प्रदेशात आजही जलद लसीकरण सुरु आहे. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 9 लाख लस दिल्या गेल्या आहेत.


गेल्या सहा दिवसांत देशभरात 3.77 कोटींपेक्षा अधिक लसींचे डोस देण्यात आले आहेत. ही संख्या, मलेशिया, सौदी अरेबिया आणि कॅनडासारख्या देशांच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही अधिक आहे. तसेच देशातील 128 जिल्ह्यांत, 45 पेक्षा अधिक वयोगटाच्या लोकांचे 50 टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण करण्यात आले आहे, तर 16 जिल्ह्यांमध्ये याच वयोगटातील लोकांचे 90 टक्के पेक्षा जास्त लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. या आठवड्यात लसीकरणाचा वेग वाढल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले तसेच, ही गती पुढेही कायम ठेवली जावी, यावर त्यांनी भर दिला.


सरकारी सूत्रांच्या म्हणण्यानुसार लसीकरणाची संपूर्ण व्यवस्था हातात घेतल्यानंतर आता केंद्र सरकारला याच वेगाने लसीकरण करण्याची इच्छा आहे. यावर्षी डिसेंबरच्या आधीच देशातील संपूर्ण लोकसंख्येचं लसीकरण करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. 


भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आज भाजप प्रदेश अध्यक्षांना पत्र लिहून लसीकरण मोहिमेत नागरिकांना मदत करण्यासाठी त्यांना लसीकरण केंद्र व रुग्णालयात नेण्याची व्यवस्था तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व तसेच जनजागृती अभियान मोहीम राबवण्याबाबत सूचना केल्या आहेत.


सुरुवातीपासूनच पंतप्रधान मोदी आढावा बैठक घेऊन लसीकरण, लस उत्पादन आणि उपलब्धता यावर बारीक लक्ष ठेवून आहेत. येत्या काळात, लसीची नवी खेप आल्याने  लसींची उपलब्धता आणखी वाढवली जाईल. या व्यतिरिक्त कोविशील्ड आणि कोवॅक्सिनसोबत रशियन लस स्पुटनिक व्ही देखील उपलब्ध होण्यास सुरुवात होईल.