PM Narendra Modi Podcast : पंतप्रधान नरेंद मोदी यांचा पहिला पॉडकास्ट प्रदर्शित झाला आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यातील विविध क्षेत्रातील अनुभव सांगितले आहेत. पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे की, "मी सामान्य माणूस आहे, देव नाही, माझ्याकडूनही चुका होतात". पंतप्रधान मोदी यांनी जेरोधाचे को-फाउंडर निखिल कामथ यांच्या यूट्यूब चॅनलसाठी दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत हे वक्तव्य केलं आहे. दरम्यान, मोदींच्या या वक्तव्यानंतर त्यांनी निवडणुकीच्या काळात केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. निवडणुकीच्या काळात मोदींनी म्हटलं होतं की, त्यांना ईश्वरानेच पाठवलं आहे. त्यानंतर आता या दोन्ही वक्तव्यांची चर्चा होऊ लागली आहे.
"मी पण एक माणूस, देव नाही"
मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख करत पंतप्रधानांनी स्पष्ट केलं की, त्यांच्याकडूनही चुका झाल्या आहेत, ते देखील एक सामान्य माणूस आहेत, देव नाहीत. पंतप्रधान असताना सरकार प्रमुख म्हणून निर्णय घेताना चुका होणे, ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण यामागील हेतू चुकीचा नसावा. माणूस असल्याने त्यांनीही निर्णय घेताना चुका केल्या, पण त्यांचा हेतू कधीही वाईट नव्हता, असं मोदींनी म्हटलं आहे.
मोदी काय म्हणाले होते?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी ते ईश्वरी अवतार असल्याचा दावा केला होता. माझा जन्म जैविकदृष्टया झालेला नाही. मला ईश्वरानेच खास शक्ती देऊन त्यांचे कार्य पूर्ण करण्यासाठी पाठविले आहे. माझ्यातील शक्ती ही साधारण शक्ती नाही. मी पूर्णपणे देवाला समर्पित आहे. मात्र, मला तो देव दिसत नाही. म्हणूनच मी पुजारी आणि भक्तही आहे, असे मोदी म्हणाले होते.
सुरक्षा कर्मचारी भीतीच्या छायेत
सुमारे दोन दशकांपूर्वी गडलेल्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला होता. पंतप्रधान मोदी यांनी पुढे सांगितलं की, "पाच ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यावेळी परिस्थिती कशी असेल, याची तुम्ही कल्पना करू शकता. मी माझ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना सांगितलं की, मला पोलिस नियंत्रण कक्षात (Police Control Room) जायचं आहे. यावर, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सुरक्षेचे कारण देत तिथे जाण्यास नकार दिला. मी म्हणालो, काहीही झालं तरी मी तिथे जाणार. सुरक्षा कर्मचाऱ्यांना काय होईल, याची भीती वाटत होती, तरीही मी म्हणालो, मी जाईन. सुरक्षा कर्मचारी खूप काळजीत होते, पण मी गाडीत बसलो आणि म्हणालो की, मी आधी हॉस्पिटलमध्ये जाईन".
जखमींना भेटण्यासाठी मोदी रुग्णालयात
पंतप्रधान मोदींनी सांगितलं की, सुरक्षा कर्मचारी त्यांना सांगितलं होतं की, "रुग्णालयांमध्येही बॉम्बस्फोट होत आहेत, पण काहीही झालं तरी, मी तिथे जाईन असे मी त्यांना सांगितलं. त्या परिस्थितीत, मलाही अस्वस्थ वाटत होतं. पण माझा मार्ग असा होता की, मी माझ्या ध्येयात मग्न होतो. मला ते वेगळ्या पद्धतीने अनुभवायला मिळाले. मला जबाबदारीची जाणीव होती".
दंगलीच्या वेळी मोदी विधानसभेत
पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं की, मी 24 फेब्रुवारी 2002 रोजी पहिल्यांदा आमदार झालो. 27 फेब्रुवारी रोजी पहिल्यांदाच विधानसभेत गेलो. मला आमदार होऊन तीन दिवसही झाले नव्हते, तेव्हा अचानक गोधराची घटना घडली. मी त्यावेळी विधानसभेत होतो. आम्ही विधानसभेतून बाहेर पडताच मी सांगितलं की मला गोधराला जायचं आहे. मला जबाबदारीची जाणीव होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :