कन्नौर (हिमाचल प्रदेश) : गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमेवरील जवानांसोबत दिवाळी साजरी केली. किन्नौरमधील सुमडोमध्ये आयटीबीपी, जवान आणि डोग्रा स्काऊटसोबत पंतप्रधान मोदींनी दिवाळी साजरी केली.


सुरक्षेच्या कारणास्तव या दौऱ्याबाबत कुणालाही संपूर्ण माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे याआधी असे वृत्त होते की, उत्तराखंडमधील चीन सीमेवर आयटीबीपीच्या जवानांसोबत मोदी दिवाळी साजरी करतील. मात्र, मोदी हिमाचल प्रदेशात पोहोचले.

पंतप्रधान मोदी आणि जवानांनी एकमेकांना मिठाई दिली. जवळपास एक तास पंतप्रधान मोदी जवानांसोबत होते. त्यांच्याशी मोदींनी संवाद साधला.

सर्जिकल स्ट्राईक आणि पाकिस्तानकडून वारंवार होणारं शस्त्रसंधीचं उल्लंघन, या सर्व पार्श्वभूमीवर मोदींच्या दौऱ्यादरम्यान सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.

या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगो गावातील लोकांशीही संवाद साधला. हे गाव सुमडोच्या अगदी जवळच आहे. विशेष म्हणजे चांगो गावातील लोकांशी संवाद साधण्याबाबत दौऱ्यात नव्हतं. मात्र, ऐनवेळी मोदींनी गावकऱ्यांशी संवाद साधला.