नवी दिल्ली :  देशात दिवसेंदिवस ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांची वाढणारी संख्या ही सर्वांच्याच चिंतेचा विषय ठरत आहे. अशातच वाढत्या ओमायक्रॉन रुग्णसंख्येमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी  संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) दौरा रद्द केला आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरातल्या अनेक देशांवर सध्या ओमायक्रॉनचे संकट घोंघावत आहे. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांनी हा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी नववर्षात त्यांचा हा दौरा करणार होते. 6 जानेवारीच्या आसपास त्यांचा संयुक्त अरब अमिरातीचा (UAE)दौरा  होण्याची शक्यता होती. 2022 मधील पंतप्रधानांचा हा पहिलाच दौरा होता. पंतप्रधानांची दौऱ्याची तारीख निश्चित झाली नव्हती, पण ते करण्याचे काम दोन्ही देश करत होते. दोन्ही देशांमधील राजकीय संबंधांना ५० वर्ष पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचा हा दौरा होत होता. मात्र, अखेर ओमायक्रॉनच्या संकटामुळे हा दौरा रद्द करण्यात आला आहे.


या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुबई एक्स्पोला भेट देणार होते. तसेच भारत-यूएई मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी देखील करणार होते. त्यामुळे पंतप्रधानांचा हा दौरा ऐतिहासिक ठरणार होता. दुबई एक्स्पोमध्ये पंतप्रधान मोदी "इंडिया पॅव्हेलियन" ला भेट देणार होते. हा एक मोठा चार मजली पॅव्हेलियन आहे, जो भारताची संस्कृती, योग, आयुर्वेद आणि अंतराळ कार्यक्रम तसेच भारताची समृद्ध परंपरा आणि हाय-टेक क्षमतांचे प्रदर्शन करतो.


सध्या आपल्या देशावर कोरोनाचे तसेच ओमायक्रॉनचे संकट घोंघावत आहे. गेल्या 24 तासात देशात नऊ हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार  गेल्या 24 तासांमध्ये 9 हजार 195 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 302 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर देशात ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. सध्या देशभरात ओमायक्रॉनची संख्या ही 800 च्या जवळपास गेली आहे. देशात ओमायक्रॉनचा धोका देखील वाढ असल्याचे चित्र दिसत आहे. देशातील 21 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. मागच्या 24 तासात ओमायक्रॉनच्या 128 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या देशात ओमायक्रॉनची रुग्णसंख्या ही 781 आहे. तर उपचारानंतर 241 ओमायक्रॉनचे रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे वाढत्या धोक्याबरोबर नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.


महत्त्वाच्या बातम्या: