नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या राज्यसभेतील भाषणाचं कौतुक केलं आहे.

 

"राजकारणाच्या पलीकडे जाऊन पर्रिकर यांनी राज्यसभेत काल तथ्य मांडलं. त्यामुळे सर्वांनी पर्रिकर यांचं भाषण एकदा जरुर ऐकण्याची गरज आहे. राज्यसभेत आतापर्यंत झालेल्या भाषणांमधलं हे सर्वात्तम भाषणापैकी एक आहे" असं मत मोदींनी ट्वीटरवर व्यक्त केलं.

 

ऑगस्टा प्रकरणावर पर्रिकरांनी काल राज्यसभेत केलेल्या भाषणावर मोदी नाराज असल्याच्या काही बातम्या येत होत्या. यावर नरेंद्र मोदींनी पर्रिकरांना आज लोकसभेत हिंदीतून आणि अधिक आक्रमकरित्या बोलण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर लगेचच मोदींनी आज ट्वीटरवरुन पर्रिकरांचं कौतुक केलं.

 

दरम्यान,  ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्याची चौकशी सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली व्हावी अशी मागणी काँग्रेसनं राज्यसभेत केली. 3600 कोटीच्या ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यात 125 कोटी रुपयाची लाच तत्कालीन सरकारमधील काही नेते, एअरफोर्समधील अधिकारी आणि प्रशासनातल्या लोकांनी घेतल्याचा आरोप भाजपनं केला आहे.

 

त्यासाठी इटालियन हायकोर्टाच्या निकालाचा हवाला भाजपनं दिला आहे. ज्यावर काँग्रेसनं जबर आक्षेप नोंदवला.

 

भाजपकडून सदनात सादर करण्यात येणारे पुरावे केंद्राच्या कायदा विभागाकडून साक्षांकीत केलेले नाहीत. त्यामुळं काँग्रेसला बदनाम करण्यासाठी सदनात आणि सदनाबाहेर हेतूपुरस्सर प्रयत्न सुरु असल्याचं गुलाम नबी आझाद यांनी म्हटलंय.

 

दरम्यान सुब्रमण्यम स्वामी यांनी फिनमेक्कनिका कंपनीला हेलिकॉप्टरचं कंत्राट मिळावं म्हणून काँग्रेसनं अनेक नियम पायदळी तुडवल्याचा आरोप केला. तसंच त्यांनी याप्रकरणात सोनिया गांधी आणि मनमोहन सिंह यांचीही सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.