मुंबई : पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पुन्हा एकदा आवाहन केलं आहे. खाद्यतेलावर परकीय चलन जास्त प्रमाणात खर्चं होतं. त्यामुळे त्याचा कमी वापर करावा. तसेच शक्य तिथे ऑनलाईन मिटिंग घ्याव्यात, शाळांनी ऑनलाईन क्लासेस घ्यावेत असं आवाहनही मोदींनी केलं. गुजरातमधील एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी देशवासियांना ही आवाहनं केली आहेत.
पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर या आधीही पंतप्रधान मोदींनी देशावासियांना काही आवाहनं केली होती. त्यामध्ये पेट्रोल, डिझेलचा वापर कमी करा, वर्षभर सोन्याची खरेदी करू नका, तसेच शक्य तिथे सार्वजनिक वाहनांचा वापर करा असं मोदी म्हणाले होते. आज सलग दुसऱ्या दिवशीही पंतप्रधानांनी तेच आवाहन पुन्हा एकदा केल्याचं दिसून आलं.
देशातील 140 कोटी लोकांनी फक्त एक पाऊल पुढे टाकलं तर 140 कोटी पावलं आपण पुढे जाऊ. त्यामुळे कोणतंही संकट आपल्या विकासाला अडचण ठरू शकणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
Narendra Modi Appeal To Citizens : नरेंद्र मोदींची देशवासियांना आवाहनं
1. जोपर्यंत परिस्थिती ठीक होत नाही तोपर्यंत सोनं खरेदी करू नका.
2. भारतीयांमध्ये डेस्टिनेशन वेडिंगचा ट्रेंड वाढतोय. त्यामुळे परकीय चलनाचा साठा भरपूर खर्च होत आहे. डेस्टिनेशन वेडिंगसाठी परदेशाला प्राधान्य देऊ नका. देशात अनेक ठिकाणं ही लग्नांसाठी योग्य आहेत. त्या ठिकाणांना पसंती द्या. लग्न इथे होत असेल तर भारताच्या मातीचाही आशीर्वाद लाभेल.
3. अनेकजण परदेशात जाऊन सुट्टी एन्जॉय करतात. सु्ट्टीसाठी परदेशात जाण्यापेक्षा देशातील ऐतिहासिक स्थळांना भेट द्या.
4. विदेशात राहणाऱ्या भारतीयांनी पाच विदेशी पर्यटकांना भारतात आणावं, त्यांना भारत दाखवावा.
5. प्रवासासाठी मेट्रोचा जास्तीत जास्त वापर करा
6. कामाच्या ठिकाणी ऑनलाईन मिटिंगला प्राधान्य द्या.
7. शाळांनी ऑनलाईन क्लासेस घ्यावेत.
8. शेतीत स्वदेशी खाद्य वापरा. रासायनिक खतांचा वापर करू नका. डिझेल पंपाऐवजी शेतात सोलार पंपाला प्राधान्य द्या.
9. खाद्यतेलावर जास्त परकीय चलन खर्च होतं. त्यामुळे त्याचा वापर कमी करा.
10. विदेशी साहित्यापेक्षा देशी उत्पादनांना प्राधान्य द्या. स्थानिक दुकानदारांकडूनच खरेदी करा.
ही बातमी वाचा:
