नवी दिल्ली: केद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह आज त्यांचा जन्मदिवस साजरा करत आहेत. यानिमित्त त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी याबाबत एक ट्वीट केलं असून त्यात त्यांनी म्हटलं आहे की, "अमित शाह यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा. देशाच्या प्रगतीमध्ये ते ज्या प्रकारे समर्पण आणि उत्कृष्ठपणे योगदान देत आहेत त्याचे साक्षीदार आपण सगळे आहोत. भाजप पक्षाला बळकट करण्यातही त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. भारताच्या सेवेसाठी ईश्वर त्यांना स्वस्थ आणि दिर्घायुष्य देवो ही प्रार्थना."
पंतप्रधांनासोबतच त्यांना केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि उत्तर प्रदेशचे मुख्य़मंत्री योगी आदित्यनाथ यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. नितीन गडकरींनी म्हटलं आहे की देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना दिर्घ आणि स्वस्थ आरोग्य लाभो.
तर योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे की, "लोकप्रिय नेता, झुंझार आणि कुशल रणनीतीकार, राष्ट्राच्या अंतर्गत सुरक्षेला मजबूत बनवणारे यशस्वी गृहमंत्री अमित शाह यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा."
रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनीही अमित शहांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी त्यांच्या संदेशात म्हटलं आहे की, "आपल्या अथक प्रयत्नांनी देशाची अंतर्गत सुरक्षा बळकट करणाऱ्या गृहमंत्री अमित शाह यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा. सीएए आणि काश्मिरचे कलम 370 हटवण्याच्या निर्णयाने प्रदीर्घ काळ देशासमोर असलेल्या समस्यांचे निराकरण झाले आहे. भाजप पक्ष बळकट करणे तसेच अनेक राज्यांत भाजपचे सरकारचा विस्तार करण्यामध्ये आपले योगदान अतुलनीय आहे."
गेली अनेक दशके नरेंद्र मोदींसोबत काम करणाऱ्या अमित शाहांचे 2014 साली देशात भाजपचे सरकार स्थापन करण्यात महत्वपूर्ण योगदान आहे. साडे पाच वर्षापेक्षा जास्त काळ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेल्या अमित शाहांनी भाजपचा देशभरात विस्तार केला. केंद्रीय गृहमंत्री म्हणूनही त्यांनी मोदी सरकारच्या अनेक निर्णयामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. काश्मिरमधून कलम 370 हटवण्याच्या धाडसी निर्णयाची अंमलबजावणी त्यांनी केली.