PM Modi in Kedarnath: पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ नोव्हेंबर रोजी केदारनाथ येथे भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर केदारनाथ मंदिरात जोरदार तयारी सुरू झाली आहे. दिवाळीच्या निमित्ताने केदारनाथ मंदिराला ८ क्विंटल फुलांनी सजावट केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ मंदिरात पूजा करतील. त्यानंतर श्री आदि शंकराचार्य समाधीचे उद्घाटन आणि श्री आदि शंकराचार्यांच्या मूर्तीचे अनावरण करतील. केदारनाथ धाम येथे पंतप्रधान मोदी दोन तास असणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी हे भाषणही करणार आहेत.
पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्यादरम्यान विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमीपूजन करणार आहेत. जवळपास १८० कोटी रुपयांच्या विकासकाम प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात येणार आहे. यामध्ये संगम घाटाचा पुनर्विकास, प्राथमिक उपचार आणि पर्यटक सुविधा केंद्र, प्रशासकीय कार्यालय आणि रुग्णालय, दोन गेस्ट हाऊस, पोलीस स्टेशन, कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटर, मंदाकिनी आस्थापथ, वर्षा आश्रय आणि सरस्वती नागरिक सुविधा भवन आदींचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरस्वती आस्थापथ प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेणार आहेत. त्याशिवाय पूर्ण झालेल्या काही पायाभूत प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. यामध्ये सरस्वती रिटेनिंग वॉल आस्थापथ व घाट, मंदाकिनी रिटेनिंग वॉल आस्थापथ, तीर्थ पुरोहित हाऊस आणि मंदाकिनी नदीवरील गरुड चट्टीचेही उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात पाचव्यांदा केदारनाथ येथे जाणार आहेत. याआधीदेखील त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाआधी केदारनाथ येथे १८ मे २०१९ रोजी भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी तेथे जवळपास १७ तास साधना केली होती.
येत्या काही महिन्यात उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या या भेटीकडे पाहिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काही महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेकांचे लक्ष या दौैऱ्याकडे लागले आहे.