Chhatrapati Shivaji Maharaj : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या काशी विश्वनाथ कॉरिडोरचं आज लोकार्पण झालं. 8 मार्च 2019 रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते काशी विश्वनाथ कॉरिडोरचं भूमीपूजन करण्यात आलं होतं. त्यानंतर दोन वर्ष नऊ महिन्यांच्या कालावधीत या कॉरिडॉरचं बांधकाम पूर्ण करण्यात आलंय. यासाठी 445 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलाय. दरम्यान काशी विश्वनाथ कॉरिडोअरचं लोकार्पण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला. या ठिकाणी औरंगजेब आला तर छत्रपती शिवाजी देखील उभे राहतात, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. याशिवाय मोदी यांनी अनेक भारतीय पराक्रमांचाही उल्लेख केला.
पंतप्रधान म्हणाले की, काशी ही चार जैन तीर्थंकरांची भूमी आहे, अहिंसा आणि तपस्येचे प्रतीक आहे. राजा हरिश्चंद्राच्या सचोटीपासून वल्लभाचार्य, रामानंद जी यांच्या ज्ञानापर्यंत. चैतन्य महाप्रभू, समर्थ गुरु रामदासांपासून स्वामी विवेकानंद, मदन मोहन मालवीय यांच्यापर्यंत. काशीची पवित्र भूमी म्हणजे ऋषी, आचार्य यांच्यासारख्या अगणित लोकांचे निवास आहे. छत्रपती शिवाजी महाराज इथे आले, अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली. राणी लक्ष्मीबाईंपासून ते चंद्रशेखर आझादांपर्यंत अनेक लढवय्यांची काशी ही कर्मभूमी आहे. भारतेंदू हरिश्चंद्र, जयशंकर प्रसाद, मुन्शी प्रेमचंद, पंडित रविशंकर आणि बिस्मिल्ला खान यांसारखे प्रतिभावंत या महान शहरातील आहेत, असे ते म्हणाले.
आक्रमणकर्त्यांनी काशी या शहरावर आक्रमण केले, नष्ट करण्याचा प्रयत्न केला. औरंगजेबाचे अत्याचार आणि दहशतीचे हे शहर साक्षीदार आहे. ज्याने तलवारीच्या धाकावर संस्कृती बदलण्याचा, कट्टरतेखाली संस्कृती चिरडण्याचा प्रयत्न केला. मात्र या देशाची भूमी ही उर्वरित जगापेक्षा आगळी आहे. इथे जर औरंगजेब आला असेल तर इथे महाराज शिवाजीही घडले आहेत. जर कोणी सालार मसूद आला तर राजा सुहेलदेव सारखे शूर योद्धे भारताच्या एकतेच्या सामर्थ्याची जाणीव करून देतात.अगदी ब्रिटीश काळातही हेस्टिंगच्या बाबतीत काय घडले होते हे काशीची जनता जाणते असे पंतप्रधान म्हणाले.
दरम्यान, काशी विश्वनाथ कॉरिडोर उभारणाऱ्या कामगारांसोबत पंतप्रधान मोदींनी भोजन केलं.. त्या सर्व कामगारांचे मोदींनी आभार मानले.. यावेळी यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते... मोदींनी कामगारांशी गप्पाही मारल्या.