PM Modi Swearing In Ceremony Live : एनडीए सरकारचा आज शपथविधी होत आहे. पंतप्रधान मोदींसोबत त्यांचे काही मंत्रीही शपथ घेणार आहेत. दरम्यान, सकाळपासून एनडीएच्या संभाव्य मंत्र्यांच्या नावाची चर्चा जोरात सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनडीएच्या काही नेत्यांना मंत्रिमंडळासाठी फोन येऊ लागले आहेत. तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून मोदींचे पुनरागमन निश्चित झाले आहे. शपथविधी सोहळा आज रविवारी संध्याकाळी 7:15 वाजता राष्ट्रपती भवनात होणार आहे. 


निर्मला सीतारामन आणि एस. जयशंकर यांना मंत्रिपद मिळणार की नाही? 


दरम्यान, जवळपास 35 जणांना मंत्रिपदासाठी फोन गेला आहे. मात्र, या यादीमध्ये मोदी सरकारमधील अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांना 'एनडीए'मध्ये मंत्रिपद मिळणार की नाही? याची चर्चा रंगली आहे. मात्र, या दोघांना फोन गेल्याची चर्चा आहे. जयशंकर मोदी यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. त्यामुळे ते मंत्रिपदी राहतील, असे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीपासून लांब राहिलेल्या निर्मला सीतारामन यांनाही फोन गेल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे दोघेही मंत्रिपदाची शपथ घेणार की नाही याचं उत्तर संध्याकाळीच मिळणार आहे.


एनडीए सरकारमध्ये टीडीपी आणि जेडीयूची मोठी भूमिका


दुसरीकडे, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनडीएच्या नेत्यांना भाजप हायकमांडचे फोन येऊ लागले आहेत. यावेळी एनडीए सरकारमध्ये टीडीपी आणि जेडीयूची मोठी भूमिका आहे. अशा स्थितीत भाजपसोबतच आघाडीतील पक्षांनाही मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार आहे. आतापर्यंत ज्या नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याची चर्चा आहे, त्यांची नावे आम्ही देत ​​आहोत. शपथ घेण्यापूर्वी नरेंद्र मोदींनी त्यांच्या 7 लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी संभाव्य मंत्र्यांची बैठक घेतली. मोदींनी त्यांना चहापानावर चर्चा करण्यासाठी बोलावले होते. या बैठकीत चार माजी मुख्यमंत्री राजनाथ सिंह, शिवराज सिंह चौहान, मनोहर लाल खट्टर आणि कुमारस्वामी यांचा समावेश होता. 


याशिवाय नितीन गडकरी, पियुष गोयल, ज्योतिरादित्य सिंधिया आणि 2019 मध्ये मंत्री असलेले अर्जुन राम मेघवाल यांना पुन्हा जबाबदारी मिळणार आहे. टीडीपीचे खासदार राम मोहन नायडूही मंत्री होणार आहेत. ३६ वर्षीय राम मोहन हे भारतातील सर्वात तरुण मंत्री असतील. LJP (R) चे चिराग पासवान, JDU चे रामनाथ ठाकूर आणि लालन सिंह, HAM चे जितन राम मांझी आणि अपना दल (S) च्या अध्यक्षा अनुप्रिया पटेल यांना देखील मंत्री केले जाऊ शकते. मंत्रिमंडळातील यूपी, राजस्थान आणि गुजरातचा वाटा कमी होईल, असे मानले जात आहे. या सर्व नेत्यांना पंतप्रधानांच्या निवासस्थानी बोलावण्यात आले आहे, जिथे पंतप्रधान मोदी त्यांच्याशी चहापानावर चर्चा करत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या